T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सपशेल अपयशी ठरला आहे. विराट कोहलीने 3 सामन्यात 1,4 आणि 0 अशा मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये (IPL) खोऱ्याने धावा ओढणाऱ्या विराटकडून भारतीय चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच विराटला फलंदाजीसाठी रोहितसह पहिल्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आहे. पण त्याची कामगिरी पाहता त्याला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी पाठवून, यशस्वी जैसवालला संधी दिली जावी अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे. मात्र भारतीय संघाचा फलंदाज शिवम दुबेने विराट कोहलीची पाठराखण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवम दुबेने विराट कोहली यशस्वी पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आगामी सामन्यांमध्ये विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपलेली पाहण्यास मिळू शकते असं शिवम दुबे म्हणाला आहे. विराट कोहली आपल्या फलंदाजीतूनच टीकाकारांना उत्तर देईल असं त्याने सांगितलं आहे. 


विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये आरसीबीसाठी फलंदाजीची सुरुवात करताना जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये 741 धावा केल्या आणि ऑरेंज कॅपचा मनाकरी ठरला. सलामीसाठी रोहित शर्मासह विराट कोहलीला पाठवायचं असल्याने यशस्वी जैसवालला संघातून वगळण्यात आलं आहे. पण याचा फटका भारतीय फलंदाजीला बसताना दिसत आहे. याचं कारण विराट कोहली दोन अंकी धावसंख्याही करु शकलेला नाही. यादरम्यान नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्कची खेळपट्टी अवघड आहे कारण अनेक फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत आहेत, असा युक्तिवाद केला जात आहे.


शिवम दुबे याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट कोहलीची धीमी सुरुवात असली तरी त्याचा फॉर्म चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे. "विराट कोहलीबद्दल बोलणारा मी कोण आहे? जर तो पहिल्या तीन सामन्यात धावा करु शकलेला नसेल, तर कदाचित पुढील तीन सामन्यात तो शतक ठोकू शकतो आणि त्यानंतर सर्व चर्चा बंद होतील," असं शिवम दुबे म्हणाला आहे. आपल्या सर्वांनाच त्याचा गेम आणि तो कसा खेळतो हे माहिती आहे असंही त्याने सांगितलं. 


2014 च्या टी-20 वर्ल्डकपपासून कोहली हा भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये 35 वर्षीय विराटने आतापर्यंत तीन डावात आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसए विरुद्ध 1, 4 आणि 0 अशा धावा केल्या आहेत. T20 वर्ल्डकपमध्ये कोहलीला गोल्डन-डकवर बाद करणारा सौरभ नेत्रावळकर हा पहिला गोलंदाज ठरला. त्याआधी कोहलीने पाकिस्तानविरुद्ध फक्त एक अंकी धाव करण्याचीही पहिलीच वेळ होती.