मुंबई : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलने वयाच्या ४४व्या वर्षी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. स्थानिक टी-२० स्पर्धेमध्ये चंद्रपॉलने द्विशतक झळकावलं आहे. चंद्रपॉलने सेंट मार्टिनमध्ये एडम सॅनफोर्ड क्रिकेट फॉर लाईफ टी-२० स्पर्धेत ७६ बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं. ४४व्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा चंद्रपॉल हा एकमेव खेळाडू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवनारायण चंद्रपॉलने त्याच्या ७६ बॉलच्या खेळीमध्ये २५ फोर आणि १३ सिक्स लगावले. चंद्रपॉलने त्याच्या इनिंगची सुरुवात स्मिथसोबत केली. स्मिथनेही चंद्रपॉलला चांगली साथ दिली. स्मिथने २९ बॉलमध्ये ५४ रनची खेळी केली. स्मिथच्या खेळीमध्ये ८ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. चंद्रपॉलच्या द्विशतकामुळे २० ओव्हरमध्ये टीमचा स्कोअर ३०२ रन एवढा झाला. चंद्रपॉलच्या टीमने ही मॅच १९२ रननी जिंकली.


स्थानिक स्पर्धा असल्यामुळे चंद्रपॉलच्या या विक्रमी खेळीची क्रिकेट रेकॉर्डमध्ये गणना होणार नाही. तीन वर्षांपूर्वीच चंद्रपॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये अजूनही चंद्रपॉल खेळत आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात चंद्रपॉल खेळला होता. यानंतर मात्र तो आयपीएलमध्ये पुन्हा दिसला नाही.