COVID-19: कोरोनाच्या महासंकटात पाकिस्तानी बॉलरची भारतीयांसाठी प्रार्थना
आर अश्विननंही कोरोनाच्या महासंकटात शेअर केला भावुक मेसेज
मुंबई: भारतासह जगभरात कोरोनाचं महासंकट अधिक चिंताजन होत आहे. सर्वसामान्यच नाही तर क्रीडा असो किंवा मनोरंजन सर्व क्षेत्रात कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. भारतात दिवसेंदिवस समोर येणारी आकडेवाडी धक्कादायक तर आहेच पण चिंतेत टाकणारी आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीरचा काळाबाजार, लसीकरणाचा तुटवडा अशा अनेक समस्या समोर असताना वेगवेगळे मार्ग काढून केंद्र आणि राज्य सरकारचे कोरोनावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाच्या महासंकटात पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यांनी भारतीयांसाठी प्रार्थना केली आहे. लवकरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. भारत सरकार ही परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीनं सांभाळण्यासाठी सक्षम आहे. असा विश्वासही शोएब यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय संघातील स्टार गोलंदाज आणि ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने देखील सोशल मीडियावर भावुक मेसेज शेअर केला आहे. तर जेवढं शक्य आहेत तेवढं या संकटाशी सामना करणाऱ्यांसाठी मी करेन असं म्हणत अश्विननं मदतीचा हात पुढे केला आहे.
रविचंद्रन अश्विन याने ट्वीट करत म्हटलं आहे की, 'माझ्या देशात काय घडत आहे हे पाहून खूप दु:खी व्हायला होतं. मी हेल्थकेअर विभागात नाही, परंतु सर्वांचे आभार. जागरुक राहून सुरक्षित रहावे असे आवाहन मला करावेसे वाटते. मला हे सांगायला आवडेल की हा व्हायरस असा आहे जो कोणालाही सोडत नाही आणि मी आपल्या सर्वांसह या लढाईत सामील आहे. मी कुणाची मदत करू शकत असेन तर मला नक्की कळवा. मला जेवढं शक्य आहे तेवढी मी पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करेन' असं आर अश्विननं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.