पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने आपलाच जुना सहकारी अब्दुल रजाक याला खडे बोल सुनावले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर त्याने अब्दुल रजाकचे कान टोचले आहेत. अब्दुल रजाकने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्डकपमधील कामगिरीवर भाष्य करताना ऐश्वर्या रायचा उल्लेख केला होता. संघाचा हेतू चांगला असावा असं सागताना त्याने ऐश्वर्या रायचं उदाहरण दिल्याने नेटकरीही नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसले. 


अब्दुल रजाक नेमकं काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ अपेक्षित कामगिरी करु शकला नाही. यावरुन एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघावर टीका केली. या कार्यक्रमात अब्दुल रजाकसह शाहिद आफ्रिदी, युनूस खान, मिसबाह उल हक, उमर गुल, सईद अजमल, शोएब मलिक आणि कामरान अकमल यांनी हजेरी लावली होती. 



क्रिकेट नियामक मंडळाला विचारसरणीच बदलावी लागेल असं सांगताना रजाक म्हणाला की, "मी त्यांच्या (पीसीबी) हेतूंविषयी बोलतोय. मी पाकसाठी खेळत होतो तेव्हा मला ठाऊक होतं की माझ्या कर्णधाराची संघाप्रती असणारी ध्येयं प्रामाणिक होती. त्यातूनच मला आत्मविश्वास, धाडस मिळालं आणि अल्लाहच्या मेहेरबानीनं मी चांगलं प्रदर्शन केलं". 


पुढे तो म्हणाला "आता तुम्ही असा विचार करताय की मी ऐश्वर्या रायशी लग्न करेन आणि त्यातून जन्मलेलं आमचं मूल सुसंस्कृत आणि प्रामाणिक असेल तर असं कधीच होणार नाही.  थोडक्यात आधी स्वत: प्रामाणिक राहा तरच संघाचं प्रदर्शन समाधानकारक राहील". 


रझाकनं हे उदाहरण देताच त्याच्या बाजुला असणाऱ्या आफ्रिदी आणि मिसबाहनं टाळ्या वाजवल्या आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. नेटकऱ्यांना पाकच्या खेळाडूंचा हा अंदाज रुचला नाही, ज्यामुळं आता त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. 


शोएब अख्तर संतापला


अब्दुल रजाकच्या या विधानावर शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे. शोएब अख्तरने एक्सवर पोस्ट शेअर करत अब्दुल रजाकसह इतर खेळाडूंनाही सुनावलं आहे. "अब्दुल रजाकने केलेल्या चुकीच्या जोक/तुलनेचा मी निषेध करतो. कोणत्याही महिलेचा असा अपमान करता कामा नये. शेजारी बसलेल्यांनी हसण्यापेक्षा आणि टाळ्या वाजवण्यापेक्षा याविरोधात आवाज उठवायला हवा होता," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.



दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने ससोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तान संघ फारच नाजूक गोलंदाजी करत होते अशी टीका केली आहे. 


कैफने वेगवान गोलंदाजांची तुलना वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर यांसारख्या दिग्गजांशी केली. जे जास्त भीतीदायक वाटायचे आणि विरोधी फलंदाजांवर मोठा प्रभाव पाडायचे. "मला वाटतं की हा पाकिस्तानचा संघ खूप नाजूक होता. वसिम, वकार, शोएब हे भीतीदायक होते. ते तुमच्याकडे पाहतात, चिडवतात. बाबर, शाहीन, रौफ यांच्यात तो औरा नव्हता. ते खूप अनुकूल दिसत होते," असं कैफ म्हणाला.