२०१९ वर्ल्ड कपनंतर शोएब मलिक निवृत्त होणार
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे.
लाहोर : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे. शोएब मलिकनंच याबाबतचे संकेत दिले आहेत. २०१९ हा माझा शेवटचा वर्ल्ड कप असल्याचं मलिकनं सांगितलं. २०१९चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. १९९९ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत शाहरजाहमध्ये मलिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वनडेमध्ये निवृत्ती घेतली असली तरी तंदुरुस्त असलो तर टी-२०मध्ये आपण खेळणार असल्याचं मलिकनं स्पष्ट केलं. टीममध्ये असताना पाकिस्ताननं टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आता पाकिस्तानकडून खेळताना वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न असल्याचं मलिक म्हणाला.
शोएब मलिकनं आत्तापर्यंत ३५.२२च्या सरासरीनं ६,९७५ रन केल्या होत्या. यामध्ये ९ शतकं आणि ४१ अर्धशतकांचा समावेश होता. याचबरोबर मलिकनं वनडेमध्ये १५४ विकेटही घेतल्या आहेत. मलिक टीममध्ये असताना पाकिस्ताननं २००९ साली टी-२० वर्ल्ड कप आणि २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
१ जुलै ते ८ जुलैदरम्यान पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेमध्ये ट्राय सीरिज होणार आहे. या ट्राय सीरिजनंतर पाकिस्तान झिम्बाब्वेविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल.