वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी डावलल्यामुळे शुभमन गिल निराश
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली.
मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली. पण टीममध्ये निवड न झाल्यामुळे युवा खेळाडू शुभमन गिल निराश झाला आहे. वेस्ट इंडिज ए विरुद्ध शुभमन गिलने शानदार कामगिरी केली होती, पण तरी गिलला डावलण्यात आलं. वेस्ट इंडिज ए विरुद्ध मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार मिळवणाऱ्या गिलला भारतीय टीममध्ये निवड होण्याची अपेक्षा होती.
क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार गिल म्हणाला, 'टीममध्ये निवड होईल असं मला वाटत होतं. रविवारी मी टीम निवडीची आतुरतेने वाट पाहत होतो. कोणत्यातरी एका फॉरमॅटमध्ये माझी निवड होईल, अशी माझी आशा होती. पण निवड न झाल्यामुळे मी निराश आहे.'
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनेही निवड समितीवर टीका केली आहे. 'टीममध्ये असे बरेच खेळाडू आहेत, जे सगळ्या फॉरमॅटमध्ये खेळू शकतात. शुभमन गिल आणि रहाणेला वनडे टीममध्ये न बघून मी हैराण झालो,' असं ट्विट गांगुलीने केलं.
शुभमन गिलने वेस्ट इंडिज ए विरुद्धच्या सीरिजमध्ये सर्वाधिक २१८ रन केले. ५ वनडे मॅचमध्ये शुभमन गिलने ३ अर्धशतक केली होती. या कामगिरीमुळे गिलला मॅन ऑफ द सीरिज देण्यात आलं.