सचिन कसबे झी मीडिया पंढरपूर: अपयश आलं किंवा एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून सहज टोकाचं पाऊल उचलणाऱ्यांसाठी एक साकारात्मकतेची उर्जा देणारी बातमी आहे. पंढरपूरच्या दिव्यांग पठ्ठ्यांनं यशस्वी कामगिरी केली आहे. जे आपल्याकडे नाही त्यासाठी रडत राहण्यापेक्षा असलेल्या कौशल्यातून त्याने आपलं एक वेगळं विश्व निर्माण केलं. सुयशचं आज जगभरात कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्टमध्ये होणाऱ्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जलतरण पटू सुयश जाधवची निवड झाली आहे. जागतिक पातळीवर दिव्यांग खेळाडूसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा भरवली जाते. या वर्षी ऑगस्ट महिन्यात ही स्पर्धा होणार आहे.


सुयशचं मूळ गाव कोणतं?


सोलापूर जिल्ह्यातील करमाळयाच्या भाळवणी मधील सुयशला यंदा टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरणमध्ये सुवर्ण पदक मिळवायची इच्छा आहे. आपल्या जिद्दीच्या आणि कौशल्याच्या जोरावर त्याने त्यासाठी प्रयत्न देखील सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो जलतरणचा सराव करत आहे.


सुयशचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान


सुयश जाधवचा 2020 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरव झाला. 2018 मध्ये जकार्ता इथे झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत तब्ब्ल 3 पदकं सुयशनं पटकावली आहेत. 50 मीटर बटरफ्लाय मध्ये 32.71 सेकंदांची वेळ नोंदवून भारताच्या खात्यात सुवर्णपदक मिळवून दिलं. तर 50 मीटर फ्री आणि 200 मीटर स्पर्धेत ब्रॉन्झ पदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली. 


सुयशची सुवर्ण कामगिरी


आपले दोन्ही हात गमावल्यानंतर सुयश हरला नाही. त्याने पुन्हा जिद्दीने उभं राहण्याचा निर्णय घेतला. आपल्या कामगिरीनं भारताची मान अधिक उंचावली आणि अनेकांसमोर एक वेगळा आदर्श उभा केला. सुयशने राज्य स्तरावर 50 सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर 37 सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर सात सुवर्ण पदकांसह आजवर 111 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्र शासनानेही सुयशला शिवछत्रपती पुरस्कार दिला आहे. सध्या जलतरण क्रीडा मार्गदर्शक अधिकारी वर्ग एका पदावर बालेवाडी पुणे येथे संधी दिली आहे.



सुयशसोबत नेमकं काय घडलं?


सुयशचे वडील नारायण जाधव सुद्धा हे एक उत्तम जलतरणपटू आहेत. एका शाळेत ते क्रीडाशिक्षक म्हणून रुजू झाले. आपला मुलगा सुयश याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण पटू म्हणून घडवायचे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. पण बारा वर्षांचा असताना सुयशला एका लग्नात विजेचा झटका बसला होता. त्यामुळे त्याला दोन्ही हात गमवावे लागले होते.


...तरी जिद्द सोडली नाही


आपले दोन्ही हात गेले असतानाही सुयशने आपल्याला आलेल्या या अपंगत्वाच्या दुःखाला न कवटाळता मोठ्या जिद्दीने जलतरण स्पर्धेत यश मिळविले. टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुयशच्या कामगिरीकडे आता लक्ष आहे