अफगाणिस्तानविरोधातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश कऱण्यात आला आहे. यासह टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळतील याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मागील 13 महिन्यांपासून दोन्ही खेळाडूंनी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघाच्या फलंदाजीचं नेतृत्व करतील असं मत व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. 2022 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या सेमी-फायनलनंतर विराट आणि रोहित तब्बल 13 महिने एकही टी-20 सामना खेळले नव्हते. नोव्हेंबरमध्ये वर्ल्डकपनंतर दोन्ही खेळाडू पुनरागमन करतील अशी आशा व्यक्त केली जात होती. पण दोघांनीही ब्रेक घेतल्याने त्यांच्या टी-20 भवितव्याबाबत अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या. दोघांनी आपण पुनरागमन करणार असल्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. 


रविवारी बीसीसीआयने अफगाणिस्तानविरोधातील टी-20 संघाची घोषणा केली आहे. 2024 वर्ल्डकपआधी भारतासाठी ही अखेरची मालिका आहे. दरम्यान बीसीसीआयने घोषणा करण्यापूर्वी सौरव गांगुलीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात सहभागी करण्याबद्दल आपलं मत मांडत पाठिंबा दर्शवला होता. तसंच रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत शंका व्यक्त होत असताना हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्याच्या चर्चेने जोर धरला होता. यावरही मत मांडताना सौरव गांगुलीने, रोहित शर्माने संघाचं नेतृत्व करावं असं स्पष्ट म्हटलं. 


"हो नक्कीच...रोहितने टी-20 वर्ल्डकपमध्ये संघाचं नेतृत्व करावं. विराट कोहलीही संघात असणारआहे. विराट कोहली एक जबरदस्त खेळाडू आहे," असं सौरव गांगुली म्हणाला आहे. दरम्यान दोघे बऱ्याच अंतराने टी-20 खेळत असल्यासंबंधी बोलताना त्यांनी, याचा काही फरक पडणार नाही असं म्हटलं. 


दक्षिण आफ्रिकेविरोधात यशस्वी जैस्वालने केलेल्या कामगिरीवर सौरव गांगुली प्रभावित झाल आहे. भविष्यात त्याला अनेक संधी मिळतील असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. डावखुऱ्या फलंदाजाने सेंच्युरियन आणि केपटाऊनच्या आव्हानात्मक ट्रॅकवर 4 डावात 50 धावा केल्या. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. "तो दुसऱ्या कसोटीत चांगला खेळला आहे, ही त्याच्या कारकिर्दीची फक्त सुरुवात आहे. त्याला पुरेशा संधी मिळतील," गांगुली पुढे म्हणाला.