पुलवामा हल्ला : गांगुली म्हणतो; `क्रिकेटच नाही, पाकिस्तानशी खेळाचे संबंध तोडा`
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानशी संबंध तोडावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाकिस्तानविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मेपासून सुरू होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना नियोजित आहे. या मॅचवर भारतानं बहिष्कार टाकावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशासकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनंही या मुद्द्यावरून आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
'भारतानं फक्त क्रिकेटच नाही, तर पाकिस्तानविरुद्ध सगळ्या खेळांमधले संबंध तोडले पाहिजेत. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक मॅच खेळली नाही, तरी भारताच्या वर्ल्ड कप विजयामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पण भारताचा पाकिस्तानला होणारा विरोध सांकेतिक असता कामा नये. जर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सेमी फायनल किंवा फायनलमध्ये समोरासमोर आले, तर भारताची न खेळण्याची भूमिका कायम राहावी,' असं गांगुली म्हणाला.
पाकिस्तानची क्रिकेटमधून हकालपट्टी करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु
इंडिया टीव्हीशी बोलताना गांगुलीनं प्रतिक्रिया दिली की 'हा वर्ल्ड कप १० टीममध्ये खेळवला जाईल. प्रत्येक टीम दुसऱ्या टीमसोबत एकदा खेळणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही, तरी पुढच्या फेरीमध्ये जायला भारताला कोणतीच अडचण येणार नाही.'
पाकिस्तानविरुद्ध खेळायचं का नाही? लक्ष्मण म्हणतो...
'भारताशिवाय वर्ल्ड कपमध्ये जाणं आयसीसीला कठीण जाईल. पण भारतामध्ये आयसीसीला असा कठोर निर्णय घ्यायला सांगायला जमेल का?, पण एक कडक संदेश देण्याची गरज असल्याचं माझं वैयक्तिक मत आहे,' असं वक्तव्य गांगुलीनं केलं.
पाकिस्तानबरोबर भारतानं सगळ्याप्रकारचे संबंध तोडले पाहिजेत, असं गांगुली म्हणाला. 'भारतीयांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या योग्य आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय सीरिज खेळण्याची कोणतीही शक्यता नाही. क्रिकेटच नाही, तर हॉकी, फूटबॉलमध्येही भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये,' असं गांगुलीनं सांगितलं.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, हरभजनची मागणी
फक्त सौरव गांगुलीच नाही, तर हरभजन सिंग यानंही वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी भूमिका मांडली होती. क्रिकेट क्लब ऑफ इंडियानं देखील वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी केली होती. तर ही वेळ देशासोबत उभं राहण्याची आहे, असं मत व्हीव्हीएस लक्ष्मण यानं मांडलं होतं.