२०१९चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकणार नाही- जाँटी रोह्डस
२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आता सगळ्या टीमची तयारी सुरु झाली आहे.
हैदराबाद : २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आता सगळ्या टीमची तयारी सुरु झाली आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक टीम दावेदार आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी रोह्डसला दक्षिण आफ्रिकेची टीम हा वर्ल्ड कप जिंकू शकणार नाही, असं वाटतंय. २०१९ सालचा वर्ल्ड कप ३० मे २०१९ पासून इंग्लंडमध्ये सुरू होणार आहे. हा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकेल, अशी आशा मी सोडून दिल्याचं रोह्डस म्हणाला. आम्ही नंबर १ टीम आहोत, पण हा वर्ल्ड कप आम्ही जिंकू शकणार नाही, असं वक्तव्य रोह्डसनं केलं.
१९९१ साली दक्षिण आफ्रिका त्यांची पहिली वनडे मॅच खेळलं होतं. ऑस्ट्रेलियाशिवाय ६० टक्क्यांपेक्षा जास्त मॅच जिंकण्याचं रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेचं आहे. मी ४ वर्ल्ड कप खेळले. यामध्ये २ सेमी फायनल आणि १ क्वार्टर फायनलचा समावेश आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमची कामगिरी निराशाजनक होते. त्यामुळे खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया रोह्डसनं दिली.
या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची टीम मोठे उलटफेर करू शकते. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या बॅटिंग आणि बॉलिंगला मदत करणाऱ्या असतील तर अफगाणिस्तान दुसऱ्या टीमला हैराण करू शकते, असं रोह्डस म्हणाला. वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला चांगलं प्रदर्शन करण्याची संधी आहे, असा विश्वास रोह्डसनं व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून एबी डिव्हिलियर्स टीममधून आत-बाहेर असायचा. त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतरही त्याच्याशिवाय खेळण्याची सवय दक्षिण आफ्रिकेला झाली आहे, असं रोह्डस म्हणाला.