जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. फाफ डुप्लेसिस आणि रस्सी व्हॅन डर डुसेन यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तबरेझ शम्सीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यामुळे तो भारत दौऱ्यावर येणार नाही. शम्सीऐवजी डावखुरा स्पिन जॉर्ज लिंडे यालाही पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाफ डुप्लेसिसने शेवटची वनडे मॅच २०१९ वर्ल्ड कपमध्ये खेळली होती. यानंतर फाफने दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद सोडलं होतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या सीरिजसाठी फाफला विश्रांती देण्यात आली होती. फाफच्याऐवजी क्विंटन डीकॉकला दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये शतक करणारा हेनरीच क्लासेन आणि महत्त्वाची खेळी करणाऱ्या कायल व्हेरीन्ने यांचं स्थान कायम ठेवण्यात आलं आहे.


भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिका ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. पहिली वनडे १२ मार्चला धर्मशालामध्ये, दुसरी वनडे १५ मार्चला दिल्लीमध्ये आणि तिसरी वनडे १८ मार्चला कोलकात्यामध्ये होईल. भारतीय टीमची या मोसमातील ही शेवटची सीरिज आहे. यानंतर २९ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल.


दक्षिण आफ्रिकेची टीम


क्विंटन डिकॉक, टेंबा बऊमा, रस्सी व्हॅन डर डुसेन, फाफ डुप्लेसिस, कायल व्हेरीन्ने, हेनरीच क्लासेन, डेव्हि़ड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, एन्डिले फेहक्लुक्वायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपाम्ला, ब्युरन हेनड्रिक्स, एनरिच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज