जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू हाशीम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीनंतर आमला निवृत्त होईल असं बोललं जात होतं. आज अखेर अमलाने १५ वर्षांच्या कारकिर्दीनंतर संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलो. तसंच अनेक मित्रही बनवले,' अशी प्रतिक्रिया अमलाने निवृत्ती जाहीर करताना दिली.


३४९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमलाने १८,६७२ रन केले. यामध्ये ५५ शतकं आणि ८८ अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा आमला हा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव खेळाडू आहे. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २०००, ३०००, ४०००, ५०००, ६००० आणि ७००० रन करण्याचा विक्रमही अमलाच्या नावावर आहे.


'माझ्यावर केलेलं प्रेम आणि दिलेल्या पाठिंब्यासाठी मी आई-वडिलांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मी एवढे वर्ष दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकलो. या प्रवासात माझ्यासोबत असणारं माझं कुटुंब, मित्र आणि सहकारी खेळाडूंचेही आभार. कठीण परिस्थितीमध्येही चांगलं खेळण्याची उर्जा चाहत्यांनी दिली,' असं अमला म्हणाला.


हाशीम आमलाने १२४ टेस्ट मॅचच्या २१५ इनिंगमध्ये ४६.४१ च्या सरासरीने ९,२८२ रन केले. यामध्ये २८ शतकं आणि ४१ अर्धशतकं होती. तर १८१ वनडेमध्ये अमलाने ४९.४७ च्या सरासरीने ९,१७९ रन केले. अमलाने वनडेमध्ये २७ शतकं आणि ३९ अर्धशतकं केली. याआधी दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन आणि लेग स्पिनर इम्रान ताहिर यानेही निवृत्तीची घोषणा केली होती.