Dale Steyn Retirement | `स्टेन गन` थंडावली, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची क्रिकेटमधून निवृत्ती
या वेगवान गोलंदाजाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 699 विकेट्स घेतल्या होत्या.
मुंबई : 'स्टेन गन' म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून तडकाफडकी निवृत्ती (Dale Steyn retirement) जाहीर केली आहे. स्टेनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. स्टेन भेदक आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. स्टेनमध्ये चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची जबरदस्त कौशल्य होतं. (South african faster bowler Dale Steyn has announced his retirement from all forms of cricket)
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
डेल स्टेनने आपल्या निवृत्तीबाबतचा संदेश देताना त्याने आपल्या आठवणींना उजाळा दिला. "20 वर्ष सराव, मॅच, प्रवास, विजय, पराजय, बंधुभाव. खूप साऱ्या आठवणी आहेत. अनेकांना धन्यवाद द्यायचेत. मी आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. मी सर्वांचा आभारी आहे", असं स्टेनने म्हंटलंय.
699 आंतरराष्ट्रीय विकेट्स
स्टेनने आफ्रिकेकडून 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 विकेट्स घेतल्या होत्या. तर 125 एकदिवसीय सामन्यांमध्ये 196 फलंदाजांना बाद केलं होतं. तर 47 टी 20 मॅचेसमध्ये 64 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा प्रकारे स्टेनने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 699 विकेट्स घेतल्या होत्या.