साऊथम्पटन : भारताचा पहिला मुकाबला मनोधैर्य खचलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. भारताचा पहिलाच सामना असल्यानं भारतासाठी ही फ्रेश सुरुवात असेल. तर दुसरीकडे दोन पराभव आणि दुखापतींनी बेजार असलेल्या आफ्रिकेच्या मनोधैर्यावर चांगलाच परिणाम झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषकाचं कडवं आव्हान पेलण्यासाठी आपण समर्थ असल्याचं भारतीय क्रिकेट संघाच्या प्रत्येक हालचालीवरून आणि विधानांवरुन दिसून येतंय. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एकदिलानं भटकंतीही करत होता आणि एकत्र कसून सरावही करत होता. आयपीएलनंतर पुन्हा कधी एकत्र येतोय आणि भारतासाठी मैदानात एकजूटीनं लढा द्यायला उतरतोय असं विराट सेनेला झालं होतं. 


एकीकडे भारतीच्या गोटात सर्वकाही आलबेल असताना दक्षिण आफ्रिकेच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण पसरलंय. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा मानहानीकारक पराभव झालाय. महत्त्वाचे खेळाडू गंभीर दुखपतग्रस्त आहेत. डेल स्टेनसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला तर दुखापतीमुळे विश्वचषकालाच मुकावं लागलंय. यामुळे आफ्रिकेच्या संघाचं मनोधैर्य चांगलंच खचलंय. 


कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने म्हटलं की, आमच्या संघात खूप काही घडत आहे. अनेकजण दुखापतग्रस्त झाले आहेत. आपल्याला मानसिकदृष्ट्या कणखर राहणं गरजेचं आहे. संघामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, सकारत्मकता निर्माण करण्याची  आणि मनोबल कायम राखण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे.


विराट सेनेसाठी अतिशय पोषक असं वातावरण असून एकजुटीनं भारत मोठ मोठ्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करायला सज्ज आहे. तर तिकडे प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ आत्ताच गारद झालाय. यामुळे भारतासाठी हा सामना सोपा वाटतोय. तर आफ्रिकेचा चांगलाच कस लागणार आहे.