Sports : पुण्याच्या देविका घोरपडेला बॉक्सिंगमध्ये गोल्ड मेडल`, आता ध्यास ऑलिम्पिक मेडलचा
जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताची 3 गोल्ड मेडलसह 11 मेडल्सची कमाई, महाराष्ट्राच्या देविका घोरपडेचा गोल्डन पंच, आता लक्ष्य ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलचं
Sport News : देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पुण्याच्या देविका घोरपडने (Devika Ghorpade) केली आहे. बॉक्सर देविकाने स्पेनमध्ये पार पडलेल्या जागतिक युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (IBA Youth Men’s and Women’s World Boxing Championships 2022) भारताला गोल्ड मेडल (Gold Medal) मिळवून दिलं. या स्पर्धेत जगभरातील 73 देशांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत भारतीय संघाने तब्बल 11 मेडल्स मिळवत अव्वलस्थान पटकावलं. यात तीन गोल्ड मेडलचा समावेश आहे. पुण्याच्या देविका घोरपडेनेही सुवर्णपदक पटकावलं.
अंतिम फेरीत देविकाचं वर्चस्व
स्पेनमधल्या ला नुसिया (La Nucia, Spain) इथं झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राची देविका घोरपडे 52 किलो वजनी गटात सहभागी झाली होती. दमदार कामगिरी करत तीने अंतिम फेरी गाठली. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी देविकाची अंतिम फेरीत लढत होती इंग्लंडच्या लॉरेन्स मेकी (England's Lauren Mackie) हिच्याशी. सामन्याच्या सुरुवातीपासूनच देविकाने वर्चस्व गाजवलं. राष्ट्रीय विजेती असलेल्या देविकाने लॉरेन्स मेकी हिला कोणतीच संधी न देता गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं.
देविका घोरपडेचं लक्ष आता ऑलिम्पिक मेडलचं
जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डमेडल मिळवल्यानंतर आता मुळची पुण्याची असलेल्या देविकाचं लक्ष्य आहे ते ऑलिम्पिक मेडलचं. सध्या देविका युवा गटात खेळत असून आणखी एका वर्षाने देविका वरिष्ठ गटात खेळण्यास पात्र ठरणार आहे. वरिष्ठ गटात तिच्यासमोरची आव्हानही वाढणार असून त्या दृष्टीने आतापासून तीने तयारी सुरु केली आहे. कठोर मेहनत करत ऑलिम्पिक मेडल पटकावण्याची इच्छा देविका बाळगून आहे.
पुण्याच्या खात्यात अनेक मेडल्स
पुण्यातल्या माऊंट कॅरेमल शाळेत शिकलेली देविका सध्या बीएमसीसी महाविद्यालयात पुढचं शिक्षण घेत आहे. 2028 च्या ऑलिम्पिकचं उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन देविका सध्या तयारी करत आहे. आशियाई स्पर्धेत देविकाला ब्राँझ मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. पण आता तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. याआधीही तीने अनेक स्पर्धांमध्ये मेडल्स पटकावली आहेत. 2017 साली पार पडलेल्या वेस्ट झोन इंडिया चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड, 2018 मधल्या स्टेट चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड तसंच खेलो इंडियामध्येही तिच्या नावावर गोल्ड मेडल जमा आहेत.
देविका सोशल मीडियावरही प्रसिद्ध
2 फेब्रुवारी 2005 मध्ये जन्मलेली देविका खेळाबरोबरच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा फॅन फॉलोअिंग आहे. दररोज ती पोस्ट शेअर करत आपलं डेली रुटीन अपडेट करत असते.