खेळाडूंना एका क्लिकवर नोकरीची संधी, स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू
Sports Quota Recruitment: स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत येणाऱ्या खेळाडुंना एकाच व्यासपीठावर सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे.
Sports Quota Recruitment: देशातील खेळाडुंसाठी आनंदाची बातमी आहे. विविध खेळातील खेळाडूंना आता सरकारी नोकरी शोधणे सोपे होणार आहे. स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत येणाऱ्या खेळाडुंना एकाच व्यासपीठावर सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. डायरेक्टर जनरल पोस्टल सर्विस, आलोक शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली. एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागीय प्रमुखांच्या उपस्थितीत अनुकंपा नियुक्ती तसेच खेळाडू कोटा भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले.
नोकरीची सर्व माहिती एकाच ठिकाणी
अनुकंपा नियुक्ती आता या ऑनलाइन अर्ज आणि प्रक्रिया पोर्टलद्वारे केली जाणार आहे. क्रीडा कोट्यातील भरतीबाबत या पोर्टलवर सर्व प्रकारचे नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. येथे, अधिसूचना आणि निवडीसंबंधी अधिसूचना एकाच ठिकाणी जाहीर केल्या जातील. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसेल.
कोणत्या सुविधा उपलब्ध होतील?
क्रीडा कोट्याशी संबंधित सर्व माहिती या पोर्टलवर उपलब्ध असेल. येथे कोणत्याही विभागातील नोकऱ्यांबाबत अधिसूचना जारी केली जाईल. निकाल आणि भरतीशी संबंधित सर्व माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध असेल.
इच्छुक आणि पात्र खेळाडुंना www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध असेल. तसेच twitter-@IndiaPostOffice या प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फेसबुक-इंडियन पोस्ट ऑफिस instagram-indiapost dop देखील तुम्ही माहिती मिळवू शकणार आहात.