नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेला पुन्हा धक्का बसला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेनं २१ रन्सच्या मोबदल्यात एक विकेट गमावली होती. ईशांत शर्मानं इनिंगच्या दुसऱ्याच बॉलवर श्रीलंकेला समरविक्रमाच्या रुपात धक्का दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका अजूनही तब्बल ३८४ रन्सनी पिछाडीवर आहे.


विराटचं द्विशतक, रोहितचं शतक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी तिसऱ्या दिवसाची सुरुवात ३१२/२ अशी करणाऱ्या भारतानं धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीचं द्विशतक आणि रोहित शर्माच्या शतकामुळे भारतानं ६१०/६ वर डाव घोषित केला आहे. विराट कोहली २१३ रन्सची मॅरेथॉन इनिंग करून आऊट झाला तर रोहित शर्मानं नाबाद १०२ रन्स बनवल्या.


विराटचं पाचवं द्विशतक


विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पाचवं द्विशतक आहे. तर रोहित शर्माचं टेस्ट क्रिकेटमधलं तिसरं शतक आहे. विराट कोहलीनं २६७ बॉल्समध्ये २१३ रन्स केल्या. विराटच्या या खेळीमध्ये १७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. रोहित शर्मानं १६० बॉल्समध्ये नाबाद १०२ रन्स केल्या. रोहितनं ८ फोर आणि एक सिक्स मारली.


४ बॅट्समनचं शतक


६१० रन्स बनवल्यामुळे भारताकडे आता तब्बल ४०५ रन्सची आघाडी आहे. या इनिंगमध्ये भारताकडून मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा या चार बॅट्समननी शतकी खेळी केली. एकाच इनिंगमध्ये चार भारतीय बॅट्समननी शतक झळकावायची ही तिसरी वेळ आहे.