Suryakumar Yadav: बारबाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. 7 रन्सने दक्षिण आफ्रिकेला नमवून भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली. मात्र फिल्डींग करता असताना बाऊंड्री लाईनजवळ डेव्हिड मिलरचा सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅच प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. दरम्यान विजयानंतर सूर्याने त्याच्या या कॅचबाबत स्वतः खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला. यातील एक घटना म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा जबरदस्त कॅच घेतला. या कॅचने केवळ 6 रन्स वाचले नाहीत तर संपूर्ण सामना भारताच्या बाजूने फिरला.


'त्या' कॅचबाबत काय म्हणाला सूर्यकुमार


वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर एका वृत्तवाहिनीने भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याच्याशी संपर्क साधला. यावेळी सूर्यकुमारने माहिती दिली की, अजूनही ते कसं झालं हे काही माहित नाही. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तो कॅच मॅच विनिंग कॅच होता, आम्ही टूर्नामेंट जिंकली. लोक आता म्हणतायत की, जेव्हा 16 रन्स हवे होते, त्यावेळी जर सिक्स गेली असती तर 5 बॉल्समध्ये 10 रन्स करावे लागले असते. मात्र यानंतर संपूर्ण सामन्याचं वातावरण वेगळं झालं असतं.



आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल


सूर्याने पुढे माहिती दिली की, सामना जिंकल्यानंतर मी माझ्या पालकांशी व्हिडिओ कॉलवर बोललो आणि त्यांनी मला सांगितले की, संपूर्ण रस्ते लोकांनी जल्लोषासाठी जाम केले आहेत. लोक रस्त्यावर आनंद साजरा करतायत. पण दोन-तीन दिवसांनी भारतात पोहोचल्यावर संपूर्ण वातावरण दिसणार आहे. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये आम्ही खेळलो तेव्हा आमचं कुटुंब आलं होतं. बसमध्ये बसून ग्राऊंडवर जाताना वाटलं की, त्याठिकाणी जाऊन ट्रॉफी उचलावी. जिंकण्याचं संपूर्ण वातावरण तयार झालं होतं पण आम्ही हरलो.