`ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी...,` गंभीरला सगळं श्रेय देणाऱ्यांना गावसकरांनी झापलं, `खरं तर रोहित शर्माने....`
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे दोन दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत फक्त अडीच दिवसांत सामना जिंकला. हवामान स्थिती योग्य नसतानाही आणि हातात कमी दिवस असतानाही भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. यानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीचं कौतुक केलं जात असून बेझबॉलशी समांतर असणारे रो-बॉल,, गॅमबॉल अशी अनेक नावं दिली जात आहेत. पण माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना हे फारसं पडलेलं नाही. याउलट त्यांनी दुसरं नवं नवा सुचवलं असून भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 35 ओव्हर्सचा खेळ झाला होता आणि बांगलादेशची स्थिती 107 धावांवर 3 गडी बाद होती. यानंतर अखेरचं सत्र पावसामुळे खेळवण्यात आलं नाही. पुढील दोन दिवसही पावसामुळे वाया गेल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचं स्वप्न अधांतरी होतं. पण भारतीय संघ जेव्हा चौथ्या दिवशी मैदानात परतला तेव्हा एका वेगळ्याच आवेशात होता. भारतीय संघाने बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूतच धाडलं नाही तर 52 धावांची आघाडी घेतली. यानंतर 146 धावांत त्यांना सर्वबाद करत फक्त 17.2 ओव्हर्समध्ये 95 धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचला आहे.
या विजयानंतर अनेकांनी भारताच्या आक्रमक फलंदाजीचं श्रेय गौतम गंभीरला देण्यास सुरुवात केली. पण सुनील गावसकर यांनी Sportstar मधील आपल्या लेखात त्यांच्यावर टीका केली असून, भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या नव्या दृष्टीकोनाचं श्रेय रोहित शर्माला द्यायला हवं असं म्हटलं आहे.
“एका वृत्तपत्राने भारतीय फलंदाजीला “बॉसबॉल” असं संबोधलं, कारण संघाचा कर्णधार किंवा “बॉस” रोहितने मार्ग दाखवला होता. तर काहींनी भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरला श्रेय देत “गॅमबॉल” असे संबोधले. बेन स्टोक्स आणि मॅक्युलम यांच्या कार्यकाळात इंग्लंडच्या फलंदाजीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असताना, आम्ही गेल्या काही वर्षांत रोहित अशी फलंदाजी करत असून संघालाही असं करण्यास प्रोत्साहित करत असल्याचं पाहत आहोत,” असं त्यांनी लिहिलं आहे.
गौतम गंभीरने स्वत: कधी क्रिकेट खेळत असताना अशाप्रकारे फलंदाजी केलेली नाही, त्यामुळे त्याला “गॅमबॉल” म्हणणं योग्य नाही असंही सुनील गावसकर म्हणाले आहेत. "गौतम गंभीर फक्त गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला प्रशिक्षण देत आहे, त्यामुळे त्याला श्रेय देणं सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी आहे. गंभीरने स्वत: कधी मॅक्यूलम प्रमाणे फलंदाजी केलेली नाही. जर श्रेय द्यायचं असेल तर ते फक्त रोहित शर्माला एकट्याला द्यायला हवं, इतर कोणाला नाही," असं स्पष्ट मदत त्यांनी मांडलं आहे.
कानपूर कसोटीत रोहितच्या जोखीममुक्त खेळीने गावसकर भारावले असून त्यांनी भारताच्या नव्या फलंदाजी शैलीला "गोहिट" म्हटलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. "तो बॉल किंवा तो चेंडू असे शब्द वापरण्यापेक्षा मी कर्णधाराचं पहिलं नाव वापरण्याचा सलला देईन, जसं की, 'गोहिट' दृष्टीकोन. बुद्धीमान लोक याला “बॅझबॉल” अशी नावं देण्यापेक्षा एखादं ट्रेंड नाव घेऊन येतील," असं गावसकरांनी सांगितलं.