मुंबई : दिग्गज ऑस्ट्रेलियाचा स्पिनर गोलंदाज शेन वॉर्नचं शुक्रवारी निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नच्या निधनानंतर जगातील क्रिकेटर विविध प्रतिक्रिया देत आहेत. अशातच माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी केलेल्या टिप्पणीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. दरम्यान चुकीची जाणीव झाल्यानंतर गावस्कर यांनी व्हिडीयो शेअर करून स्पष्टीकरण दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही शेन वॉर्नला महान स्पिनर मानता का, असा प्रश्न गावस्कर यांना विचारण्यात आला होता. यावर गावस्कर म्हणाले, स्पिनर्समध्ये मी श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरन याला वॉर्नच्या वरच्या क्रमांकावर ठेवेन. माझ्या नजरेत भारतीय स्पिनर आणि मुथैय्या मुरलीधरन त्याच्यापेक्षा वरचढ आहेत.


दरम्यान गावस्कर यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. वाद वाढत असल्याचं लक्षात आल्यावर गावस्कर यांनी सोशल मीडियावर एक निवेदर जाहीर केलं आहे. या व्हिडीयोमध्ये त्यांनी वॉर्नबाबत केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


यामध्ये गावस्कर म्हणाले, गेला आठवडा क्रिकेटसाठी वाईट होता कारण आम्ही शेन वॉर्न आणि रॉडनी मार्श या खेळातील दोन महान खेळाडूंना गमावलं. मला एका अँकरने विचारलं, शेन वॉर्न महान स्पिनर आहे का? मी त्याला प्रामाणिकपणे उत्तर दिलं. मला वाटतं हा प्रश्न विचारला नको होता आणि मीही त्याचं उत्तर द्यायला नको होतं. वॉर्न हा आतापर्यंतच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक होता.


पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा


ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असं राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.