Gavaskar on Virat Kohli vs Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंदर्भात (Virat Kohli) मोठं विधान केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक करण्यासंदर्भात भाष्य करताना गावस्करांनी विराटबद्दलची भविष्यवाणी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिरुवनंतरपुरममधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 110 चेंडूंमध्ये 166 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर गावस्करांनी हे विधान केलं आहे. विराटने रविवारी एकदिवसीय सामन्यांमधील आपलं 46 वं शतक पूर्ण केलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचं हे 73 वं शकत ठरलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर (Sachin Tendulkar) सर्वाधिक शतकं झळकावणारा विराट हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम आहे. गावस्कर यांनी याच पार्श्वभूमीवर बोलताना विराट ज्या पद्धतीने खेळतोय आणि तो ज्या फॉर्ममध्ये सध्या आहे ते पाहता इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलच्या आधी विराट सचिनचा शतकाचा विक्रम मोडेल असा विश्वास व्यक्त केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावे 49 शतकं असून विराटने आतापर्यंत 46 शतकं झळकावली आहेत.


काय म्हणाले गावस्कर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावस्कर यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "वो (विराट) ज्या पद्धतीने सध्या खेळतोय आणि तो ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो लवकरच हा विक्रम मोडेल. सध्या भारतीय संघ आगामी काळात न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. म्हणजेच आयपीएल आधी भारतीय संघ सहा सामने खेळणार आहे. विराटला एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनच्या विक्रमाशीबरोबरी करण्यासाठी तीन शतकांची आवश्यकता आहे. सध्या तो ज्या पद्धतीने खेळतोय ते पाहता मला असं वाटतंय की तो आयपीएल आधीच सचिनच्या सर्वाधिक शतकांचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम मोडेल," असं म्हटलं.


...तर 100 शतकांचा विक्रम मोडणं कठीण नाही


गावस्कर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विराटबद्दल आणखीन एक मोठं विधान केलं. त्यांनी अशी भविष्यवाणी केली आहे की कोहली सचिनचा शतकांच्या शतकांचा विक्रमही मोडीत काढू शकतो. "विराट पुढील पाच ते सहा वर्ष क्रिकेट खेळला तर तो सचिनचा हा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास गावस्करांनी व्यक्त केलं. विराटची शतकांची वार्षिक सरासरी ही सहा ते सात इतकी आहे. त्यामुळेच तो वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत खेळला तर पुढील चार ते पाच वर्षांमध्ये तो सचिनच्या 100 शतकांच्या विक्रमाला मागे टाकेल," असंही गावस्कर यांनी म्हटलं.


फिटनेससंदर्भातही केलं भाष्य


गावस्कर यांनी सचिन आणि कोहलीमधील साम्य सांगताना फिटनेसचा उल्लेख केला. सचिन वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत खेळण्यामागे एक प्रमुख कारण हे होतं की तो त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष द्यायचा. विराटही फिटनेसबद्दल फार जागृक आहे. सध्या तो 34 वर्षांचा आहे. पुढील काही वर्ष त्याने स्वत:ला अशाचप्रमाणे फिट ठेवलं तर वयाच्या चाळीशीपर्यंत क्रिकेट खेळेल. असं झाल्यास सचिनचा विक्रम मोडणं त्याला सहज शक्य होईल, असे संकेतही गावस्करांनी दिले.