बीसीसीआयने नुकतीच दुलीप ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. के एल राहुल, शुभमन गिल, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जाडेजा यांना दुलीप ट्रॉफीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत नसताना बीसीसीआय सर्व खेळाडूंना स्थानिक क्रिकेट खेळणं अनिवार्य करु शकतं असा अंदाज होता. मात्र यातून काही खेळाडूंना मुभा देण्यात आली आहे. चार संघांची घोषणा करताना बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या यांना मात्र विश्रांती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जसप्रीत बुमराहवर जास्त वर्कलोड टाकायचा नसल्याने त्याला विश्रांती देणं समजू शकतो. आगामी स्पर्धांसाठी बुमराहचा फिटनेस जास्त महत्वाचा आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्या 2018 पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. पण रोहित शर्मा, विराट कोहली यांना खेळण्यात येत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघ आगामी काळात बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका खेळणार आहे. 


भारताचे महान फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी कोहली आणि रोहितच्या दुलीप ट्रॉफीमधील अनुपस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशाविरोधातील मालिकेविरोधात दोघेही जास्त प्रॅक्टिस न  करता मैदानात उतरलेले असतील याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 


"निवडकर्त्यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली याची दुलीप ट्रॉफीसाठी निवड केलेली नाही. याचा अर्थ बांगलादेशविरोधातील कसोटी मालिकेत दोघेही जास्त सराव न करता मैदानात उतरलेले असतील," असं गावसकर यांनी मिड-डेमधील लेखात लिहिलं आहे. 


सुनील गावसकर यांनी यावेळी सांगितलं की, जेव्हा खेळाडू वयाच्या तिशीपर्यंत पोहोचतो तेव्हा फिटनेस चांगला ठेवणं कठीण होतं. यावर सतत क्रिकेट खेळणं हा एकच उपाय आहे. 


“जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूला नाजूकपणे हाताळणं समजू शकतो. त्याच्या पाठीची काळजी घेण्याची गरज आहे. पण फलंदाज मध्यभागी थोडा वेळ फलंदाजी करूनही हे करू शकले असते. एखाद्या खेळाडूने कोणत्याही खेळात तिशीच्या मध्यापर्यंत मजल मारली की, नियमित स्पर्धा खेळणं त्याला आपला फिटनेस कायम ठेवण्यात मदत करते. पण जेव्हा मोठा काळ जातो तेव्हा स्नायूंमधील शक्ती कमी होते पूर्वीप्रमाणे स्टँडर्ड कायम ठेवणं कठीण जातं,” असं ते म्हणाले. 


रोहित-विराटला स्थानिक क्रिकेट खेळवण्यात अर्थ नाही- जय शाह


दरम्यान, कोहली जानेवारीपासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही, वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंड कसोटीला तो मुकला होता. तर रोहित शेवटचा मार्चमध्ये कसोटी सामन्यात खेळला होता. तत्पूर्वी, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित आणि कोहलीची निवड न करण्याच्या कारणाचं समर्थन केलं आहे. भारतीय संघाला कसोटी मालिका खेळताना त्यांची गरज असून स्थानिक क्रिकेट खेळताना त्यांना दुखापत व्हावी अशी इच्छा नाही. 


“विराट आणि रोहितला देशांतर्गत क्रिकेट खेळायला सांगण्यात काही अर्थ नाही. ते जखमी होण्याचा धोका असतो,” असं शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले होते.