ना रोहित, ना कोहली.. `या` खेळाडूमुळेच जिंकू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025; गावसकरांचं विधान
Sunil Gavaskar Says India Can Be Invincible In Tests If This Player Plays: गावसकर यांनी कसोटीमध्ये भारताला अजिंक्य संघ म्हणून पुढे यायचं असेल तर या खेळाडूला कसोटी खेळण्यासाठी बीसीसीआयने राजी करावं असं म्हटलं आहे.
Sunil Gavaskar Says India Can Be Invincible In Tests If This Player Plays: भारतीय क्रिकेट संघाने अनेकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारतीय संघाने अनेकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपणच दादा असल्याचं दाखवून दिलं आहे. भारतीय संघ सलग दोनवेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. मात्र भारताला एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. पहिल्यांदा म्हणजेच 2021 मध्ये भारताला न्यूझीलंडने तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पराभूत केलं. भारताला कसोटीमधील ही सर्वोच्च स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन मालिका जिंकण्याचा कोणालाही न मजलेला पराक्रमही केला आहे. भारताने इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिका अनिर्णित राखली. घरच्या मालिकेमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 तर इंग्लंडविरुद्धची मालिका 4-1 ने जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
भारत 'या' एका खेळाडूमुळे कसोटीत अजिंक्य होऊ शकतो
मात्र भारतीय संघाच्या कसोटीमधील कामगिरीबद्दल बोलताना नुकतीच वयाची पंच्च्यातरी गाठलेले ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघ कसोटीमध्ये अजिंक्य व्हायचं असेल तर काय करावं लागेल हे सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 1948 साली सर डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर 2002 साली स्टीव्ह वॉर्नच्या नेतृत्वाखाली अजिंक्य होण्याचा सन्मान पटकावला होता. मात्र त्यानंतर कोणालाही हे जमलेलं नाही. मात्र गावसकर यांच्या म्हणण्यानुसार एक भारतीय खेळाडू भारतीय कसोटी संघाला अजिंक्य बनवू शकतो. विशेष म्हणजे हा खेळाडू ना रोहित शर्मा आहे, ना विराट कोहली आहे ना चेतेश्वर पुजारा आहे. हा खेळाडू आहे, हार्दिक पंड्या! हार्दिकमुळे भारत कसोटीत अजिंक्य ठरु शकतो असा दावा सुनील गावसकर यांनी केला आहे.
भारताचा कसोटीचा भरगच्च कार्यक्रम
'रिव्हस्पोर्ट्स'बरोबर बोलताना सुनील गावसकर यांनी हे विधान केलं आहे. भारतीय संघाचं आता कसोटीचं व्यस्त वेळापत्रक लवकरच सुरु होणार आहे. बांगलादेशविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर चषकाच्या 5 कसोटी भारत खेळणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनाने हार्दिक पंड्याशी बोलून त्याला पुन्हा कसोटी संघात येण्यास भाग पाडावं असं गावसकर यांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, 'कमाल आहे हा माणूस'
पुढील दोन महिन्यांमध्ये...
"मला वाटतं ते हे करु शकतात. पुढील दोन महिन्यांमध्ये हार्दिक पंड्याला कसोटी खेळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला जावा. त्याने दिवसभरातून केवळ 10 ओव्हर गोलंदाजी केली आणि त्याच्या शैलीत फलंदाजी केली तर भारतीय संघ अजिंक्य ठरु शकतो असं मला वाटतं. असं झालं तर भारत नक्कीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकेल. असं झाल्यास भारत ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकतो," असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> 'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान
त्याची कामगिरी कशी?
हार्दिक पंड्या भारतासाठी 11 कसोटी सामने खेळला आहे. त्याने एकूण 523 धावा केल्यात. पंड्याने कसोटीत 17 विकेट्स घेतल्या आहेत. तो भारतासाठी शेवटची कसोटी 2018 मध्ये खेळला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धची ही कसोटी दुखापतीमुळे अर्ध्यात सोडली होती. एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 वर अधिक लक्ष देण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेट सोडलं. टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पंड्याने 144 धावा आणि 11 विकेट्स घेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे. आता याच जोरावर गावसकर यांनी पंड्याचा कसोटीत पुन्हा समावेश करावा अशी मागणी केली आहे.