मुंबई : वर्ल्डकप ट्रॉफीवर टीम इंडियाने २ वेळा आपले नाव कोरले आहे. परंतु टीम इंडियासाठी वर्ल्डकपमधील एक कटू आठवण आहे. ती म्हणजे सुनील गावसकर यांची संथ खेळी. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेला १९७५ पासून सुरुवात झाली. म्हणजेच पहिला वर्ल्डकप स्पर्धा ही १९७५ ला खेळण्यात आली. या पहिल्याच वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये 'लिटील मास्टर' सुनील गावसकर आणि पर्यायाने टीम इंडियाच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड झाला होता. त्यामुळे वर्ल्डकपची सुरुवात टीम इंडियासाठी निराशाजनक झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकप स्पर्धेत १९७५ साली एकूण ८ टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्ये वेस्टइंडीज, इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलँड, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका या टीमचा सहभाग होता. जेव्हा जेव्हा वर्ल्डकपबद्दल बोलले जाते, तेव्हा तेव्हा सुनील गावसकर यांच्या त्या खेळीबद्दल नक्कीच विषय काढला जातो.


नक्की काय झालं होतं ?


 गोष्ट बरोबर ४४ वर्षांपूर्वीची आहे. ७ जून १९७५ चा तो दिवस. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मॅच खेळण्यात आली होती. तेव्हा वर्ल्डकपमधील मॅच ६० ओव्हरची खेळली जायची. इंग्लडने प्रथम बॅटिंग करताना ६० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून ३३४ रन कुटल्या. टीम इंडियाला विजयासाठी ६० ओव्हरमध्ये ३३५ रनचे तगडे आव्हाने होते. 


परंतु टीम इंडियाला इंग्लंडशी झुंज देता आली नाही. टीम इंडियाला ६० ओव्हरमध्ये, ३ विकेट गमावून १३२ रनच करता आल्या. गावसकर यांनी या मॅचमध्ये एकूण १७४ बॉलचा सामना केला. म्हणजेच ६० ओव्हरपैकी २९ ओव्हर ते एकटेच खेळले. टीम इंडियाने ही मॅच तब्बल २०२ रनच्या फरकाने गमावली. वर्ल्डकपमध्ये मोठ्या फरकाने हरण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावे झाला होता. हा रेकॉर्ड तब्बल २८ वर्षांनतर मोडीत निघाला. 


या १७४ बॉलमध्ये गावसकर यांनी केवळ ३६ रन केल्या. गावसकर यांच्या धीम्या खेळीमुळे या मॅचचा वर्ल्डकप इतिहासात आवर्जून उल्लेख केला जातो.


पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि पंतप्रधान इमरान खानने या मॅचचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे. वनडे आणि टेस्ट मॅच या किती भिन्न स्वरुपाच्या आहेत, हे  गावसकरांच्या खेळीवरुन लक्षात येते, असा उल्लेख त्याने या पुस्तकात केला आहे.