कृणालला कोरोना, SKY आणि Prithvi चा इंग्लंड दौरा हुकणार?
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England Test Series 2021) बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीये.
कोलंबो : टीम इंडियाचा बी संघ सध्या श्रीलंकौ दौऱ्यावर (India Tour Sri Lanka 2021) आहे. या दौऱ्यात टीम इंडियाने वनडे मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर टी 20 मालिकेचीही विजयाने सुरुवात केली. उभयसंघात आज 27 जुलैला दुसरा सामना खेळवण्यात येणार होता. पण या दुसऱ्या टी 20 आधी टीम इंडियाचा ऑलराऊंडर कृणाल पंड्याला कोरोनाची (Krunal Pandya Corona Positive) लागण झाल्याचं वृत्त समोर आलं. याबाबतची माहिती बीसीसीआयने (BCCI) ट्विटद्वारे दिली. त्यामुळे दुसरा सामना स्थगित करण्यात आला. दरम्यान कृणालला कोरोना झाल्याने मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोघांना इंग्लंड दौऱ्याला (India Tour England 2021) मुकावे लागणार का, असा सवाल आता उपस्थित होतोय. (Suryakumar Yadav and Prithvi Shaw likely will be miss England tour 2021 due to Krunal Pandya covid positive)
टीम इंडियाचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सलामीवीर शुबमन गिल, तर त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान या तिकडीला दुखापतीने ग्रासलंय.त्यामुळे या तिघांना इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळता येणार नाही. त्यामुळे या दोघांच्या जागी बदली खेळाडू म्हणून सूर्यकुमार आणि पृथ्वीची वर्णी लागलीय. पृथ्वीचा समावेश बॅकअप ओपनर म्हणून करण्यात आलाय. तर सूर्या मीडल ऑर्डरमध्ये खेळताना दिसणार आहे.
दरम्यान आता कृणालचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उभयसंघाच्या खेळाडूंचीही आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. त्यामुळे कृणालला कोरोना झाल्याने पृथ्वी आणि सूर्याची इंग्लंड वारी हुकणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
दुसरी टी 20 मॅच कधी?
कृणाल पंड्याला कोरोना झाल्याने टीम इंडिया आणि श्रीलंकेच्या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आलेय. या उभयसंघातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली जाणार आहे. सर्व खेळाडूंची टेस्ट नेगिटव्ह आली, तर हा स्थगित केलेला दुसरा सामना बुधवारी 28 जुलैला खेळवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
टीम इंडिया आघाडीवर
टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून भारताला टी 20 मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा दुसरा सामना महत्वाचा असणार आहे.