विराट-रोहितलाही जे जमलं नाही ते सूर्याने करुन दाखवलं! जगातील केवळ दुसरा खेळाडू ज्याने...
Suryakumar Yadav Record: वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवला लय गवसली आणि त्याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर असा एक विक्रम केला आहे की जो विराट कोहली आणि रोहित शर्मालाही शक्य झालेला नाही.
Suryakumar Yadav Record: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये लय गवसली. पहिल्या 2 सामन्यांमध्ये नावाला साजेशी कामगिरी न करता आलेल्या सूर्यकुमारने तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीची पिसं काढली. सूर्यकुमारने 44 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांसहीत 83 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजविरुद्ध कोणत्याही भारतीय फलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. सूर्यकुमारने केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने 14 चेडूंमध्ये 64 धावा कुटल्या.
कोणता विक्रम केला आहे सूर्यकुमारने?
सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 षटकार पूर्ण केले आहेत. षटकरांचं शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. तर जागतिक स्तरावर असा पराक्रम करणारा तो 13 वा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमारआधी हा पराक्रम रोहित शर्माने आणि विराट कोहलीने केला आहे. रोहितच्या नावावर 182 षटकार आहेत. तर विराटच्या नावावर 117 षटकार आहेत. मात्र या दोघांच्याही तुलनेने सूर्यकुमार यादव या यादीत अधिक सरस ठरला आहे. कारण सूर्यकुमारने कमी चेंडूंमध्ये हा विक्रम केलाय. म्हणजेच सर्वात जलद गतीने 100 षटकारांचा टप्पा ओलांडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार पहिल्या स्थानी आहे.
विराट आणि रोहितपेक्षाही सरस
सूर्यकुमारने आपल्या 49 व्या डावामध्ये 100 षटकारांचा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. जागतिक स्तरावर सूर्यकुमारपेक्षा कमी सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवणारा केवळ एक खेळाडू आहे. इव्हिन लुईसने हा विक्रम 42 सामन्यांत नोंदवला आहे. वेगाने 100 षटकार झळकावण्याबाबतीत सूर्यकुमार यादव हा विराट आणि रोहितच्याही पुढे गेला आहे.
धवनलाही मागे टाकलं
सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. 83 धावांच्या खेळीमुळे त्याने शिखर धवनला मागे टाकले आहे. या खेळीनंतर सूर्यकुमारने 51 सामन्यांमधील 49 डावांत 1780 धावा केल्या आहेत. भारताकडून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल हे सूर्यकुमारपेक्षा पुढे आहेत.
सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा भारतीय
तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध वेस्ट इंडीजमध्येच सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भरातीयांच्या यादीत सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानी आला आहे. त्याने या देशात यजमानांविरोधात 2 अर्धशतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावलं आहे. भारताने तिसऱ्या टी-20 मध्ये यजमानांना 7 गडी राखून पराभूत केलं. 5 सामन्यांच्या मालिकेतील हा सामना जिंकून भारताने मालिका 1-2 वर आणली आहे.