Team India In Mahakaleshwar Temple: भारतीय संघ महाकालेश्वरच्या चरणी; घातलं `हे` साकडं
Team India In Mahakaleshwar Temple: इंदूरमध्ये तिसरा सामना होणार असून त्याच्या एक दिवस आधीच भारतीय संघाने उज्जैनमधील मंदिरात जाऊन महाकालेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.
Team India In Ujjain Mahakaleshwar Temple: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (india vs new zealand) सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटचा सामना (india vs new zealand 3rd odi) मंगळवारी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर येथील होळकर स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या मालिकेमध्ये भारताने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. शेवटचा सामना जिंकून पाहुण्यांना क्लिन स्वीप करण्याचा भारतीय संघाचा इरादा असेल. तर दुसरीकडे मालिकेतील एखादा तरी विजय आपल्या नावावर नोंदवण्याच्या उद्देशाने न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरणार आहे. असं असतानाच या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघातील खेळाडून उज्जैनमधील बाबा महाकाल मंदिरामध्ये दर्शनसाठी गेले होते. यावेळी खेळाडूंनी जलाभिषेक करत एक विशेष मागणं बाबा महाकालकडे मागितलं.
कोण कोण गेलं होतं दर्शनाला?
भारतीय संघातील अनेक खेळाडू यावेळी दर्शनसाठी गेले होते. इंदूरमध्ये संघ दाखल झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि इतर सपोर्टींग स्टाफमधील सहकारी इंदूरपासून ४५ किलोमीटर दूर असलेल्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. त्यांनी जलाभिषेक केला. यावेळी हे तिघेही पारंपारिक वस्त्रामध्ये होते. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काय मागणं मागितलं देवाकडे?
महाकालेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर सूर्यकुमार यादवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने "संघाने मालिका जिंकली आहे त्यामुळे आम्ही मालिकेऐवजी ऋषभ पंत लवकरात लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना केली," असं सांगितलं. भारतीय संघाचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतचा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला होता. सध्या मुंबईमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सुर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्वत:साठी देवाकडे मागणं मागण्याऐवजी पंतच्या प्रकृतीबद्दलची मागणी केल्याच्या मुद्द्यावरुन अनेक चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. आपल्या सहकाऱ्याला लवकरच बरं वाटवं म्हणून या खेळाडूंनी देवाला साकडं घालण्याची कृती ही खरोखरच कौतुकास्पद असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
भारताची बाजू भक्कम
भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येणारा तिसरा सामना हा होळकर स्टेडियमवर होणार आहे. हे मैदान भारतीय संघासाठी फार खास आहे. या मैदानावर भारत कधीह पराभूत झालेला नाही. या मैदानावर भारताने पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी पाचही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळेच आजही भारताचं मोठं आव्हान पाहुण्यांसमोर असणार आहे. या मैदानावर भारताने इंग्लंडला दोनदा पराभूत केलं आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दादा संघांनाही या मैदानावर भारताने धूळ चारली आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे.