BBL 2022: काय चेष्टा करता राव! T20 क्रिकेटच्या इतिहासात झाली सर्वांत कमी स्कोरची नोंद
Sydney Thunder vs Adelaide Strikers: अॅडलेट स्टाईक्सने दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा संघ थंड पडल्याचं पहायला मिळालं. हेन्री थॉर्नटनच्या (Henry Thornton) भेदक माऱ्यासमोर सिडनीची टीम टिकू शकली नाही.
Big Bash League, Sydney Thunders: सध्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगच्या (Big Bash League) 12 व्या हंगामाला दणक्यात सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. 12 व्या हंगामातील (BBL12) पाचवा सामना सिडनी थंडर (Sydney Thunder) आणि अॅडलेट स्टाईक्स (Adelaide Strikers) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत कमी स्कोरची नोंद झाली आहे. त्यानंतर आता या सामन्याची एकच चर्चा होताना दिसत आहे. (Sydney Thunder bowled out for 15 by Adelaide Strikers in BBL lowest total in mens T20 cricket)
सर्वप्रथम टॉस जिंकून अॅडलेट स्टाईक्सने (Adelaide Strikers) फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अॅडलेटची सुरूवात दमदार झाली. क्रिस लिनने (Chris Lynn) 36 धावा चोपत चार फोर आणि एक षटकार खेचला. त्यानंतर ग्रॅडीहोम्सने 33 धावा (de Grandhomme) करत रनस्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी कोणत्या खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे अॅडलेट स्टाईक्सला 20 ओव्हरमध्ये 139 धावा करता आल्या.
अॅडलेट स्टाईक्सने दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सचा संघ थंड पडल्याचं पहायला मिळालं. सिडनी थंडरच्या संघाने फक्त 15 धावा करत गाशा गुंडाळला. हेन्री थॉर्नटनच्या (Henry Thornton) भेदक माऱ्यासमोर सिडनीची टीम टिकू शकली नाही. हेन्री थॉर्नटनने या सामन्यात 5 विकेट मिळवल्या. तर वेस आगरने (Wes Agar) देखील 2 ओव्हरमध्ये 4 विकेट नावावर करत सिडनीच्या स्टार फलंदाजांना टिकू दिलं नाही.
दरम्यान, सिडनीच्या एकाही फलंदाजांना डबल आकडा पार करता आली नाही. अवघ्या 15 धावांत ऑलआऊट होऊन सिडनी थंडर्सने एक अतिशय लाजिरवाणा विक्रम (Sydney Thunder vs Adelaide Strikers) आपल्या नावावर केला आहे. T20 फॉरमॅटमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या सामन्यात (Big Bash League 2022-23 ) सिडनी थंडर्सचा संघ पहिल्या पॉवरप्लेपर्यंतही टिकू शकला नाही आणि अवघ्या 5.5 ओव्हरमध्ये संपूर्ण संघ बाद झाला. त्यानंतर आता तुर्की आणि चेक गणराज्य यांचा 21 धावांचा रेकॉर्ड सिडनीने मोडलाय.