शारजाह : टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा २२ रननी दणदणीत विजय झाला आहे. नॉर्थन वॉरियर्सनं ठेवलेल्या १४१ रनचा पाठलाग करताना शाहिद आफ्रिदीच्या पखतून्सना १० ओव्हरमध्ये ११८/७ एवढाच स्कोअर करता आला. या विजयाबरोबरच नॉर्थन वॉरियर्सनी दुसऱ्या टी-१० क्रिकेट लीगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. पखतून्सच्या आंद्रे फ्लेचरनं १८ बॉलमध्ये सर्वाधिक ३७ रन केले. नॉर्थन वॉरियर्सच्या क्रिस ग्रीन आणि हार्दुस विलजोवेननं सर्वाधिक २-२ विकेट घेतल्या. आंद्रे रसेल आणि रवी बोपाराला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये पखतून्सनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. नॉर्थन वॉरियर्सनं १० ओव्हरमध्ये १४०/३ एवढा स्कोअर केला. नॉर्थन वॉरियर्सकडून रोवमॅन पॉवेलनं २५ बॉलमध्ये सर्वाधिक नाबाद ६१ रन केले. पॉवेलच्या इनिंगमध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. नॉर्थन वॉरियर्सचा कर्णधार डॅरेन सॅमीनं ९ बॉलमध्ये नाबाद १४ रन केले. आंद्रे रसेलनं १२ बॉलमध्ये ३८, निकोलास पूरननं १० बॉलमध्ये १८ आणि लेंडल सिमन्सनं ४ बॉलमध्ये ५ रन केले.


पखतून्सकडून कर्णधार शाहिद आफ्रिदी, मोहम्मद इरफान आणि शरफुद्दीन अश्रफ यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.


मागच्यावर्षी सुरु झालेली टी-१० सुपर लीग क्रिकेटमधला नवा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत दोन्ही टीममध्ये १०-१० ओव्हरची मॅच होते. ही मॅच फक्त दीड तास चालते. मागच्यावर्षी शारजाहमध्ये ६ टीममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी टी-१० लीगमध्ये ८ टीम सहभागी झाल्या. आयोजकांनी यावर्षी स्पर्धेत भाग घेतलेल्या टीमची फी ४,००,००० डॉलरऐवजी १.२ मिलियन डॉलर केली होती.


टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.