T20 World Cup Team India Semi Final Match: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने जग्गजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत उपांत्यफेरीमध्ये स्थान निश्चित केलं आहे. भारताने दिलेलं 206 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवलं नाही. ऑस्ट्रेलिया संपूर्ण संघ 181 धावांपर्यंतच मजल मारु शकला. निर्धारित 20 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात जेमतेम 180 चा टप्पा ओलांडला. भारताच्या या विजयासहीत आता भारतीय संघ उपांत्यफेरीमध्ये पुढील सामना गुरुवारी खेळणार आहे. 


भारताच्या डाव्यात काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर विराट कोहली भोपळाही न फोडता 5 व्या चेंडूवर बाद झाला. मात्र कर्णधार रोहित शर्माने तुफानी खेळी करत भारताला भक्कम धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली. रोहितने 41 बॉलमध्ये 92 धावा केल्या. रोहितबरोबरच सुर्यकुमार यादवने 16 बॉलमध्ये 31 आणि शिवम दुबेने 22 बॉलमध्ये 28 धावा केल्या. हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा यांनी शेवटच्या काही बॉलमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून 205 धावांपर्यंत मजल मारता आली.


ऑस्ट्रेलियाच्या डावात काय झालं?


206 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर ट्रॅव्हीस हेडने 43 बॉलमध्ये 76 धावा केल्या. हेडच्या खेळीमुळे भारताच्या हातून सामना जातो की काय असं काही काळ वाटू लागलं होतं. मात्र भारताने उत्तम फिल्डींग आणि भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर दमदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाकडून हेड बरोबरच मिचेल मार्श 28 बॉल 37 धावा आणि ग्लेन मॅक्सवेल 12 बॉल 20 धावा यांनी भारतीय संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतल्या. 37 धावांमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या. तर कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. अक्सर पटेलने 3 ओव्हरमध्ये 21 धावा देत एक विकेट घेतली.


भारताचा पुढला सामना कोणाविरुद्ध?


भारत हा पहिल्या गटामध्ये अव्वल राहत उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला आहे. आता भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारताचा हा सामना 27 तारखेला होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होणार आहे.


भारत आणि इंग्लंडचा रेकॉर्ड कसा?


टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारत आणि इग्लंड आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये आमने-सामने आलेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. संपूर्ण टी-20 फॉरमॅटबद्दल बोलायचं झाल्यास भारत आणि इंग्लंड आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 23 सामने खेळले असून त्यापैकी 12 सामने भारताने जिंकलेत तर इंग्लंडला 11 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. इंग्लंडच्या संघाचा संध्याचा फॉर्म पाहता ते भारताला तगडं आव्हान देऊ शकतात.