शारजाह : युएईमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टी-१० सुपर लीगच्या एलिमिनेटर मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा शानदार विजय झाला आहे. या मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सनी मराठा अरेबियन्सचा १० विकेटनं पराभव केला आणि फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. नॉर्थन वॉरियर्सला त्यांच्या पहिल्याच क्वालिफायर मॅचमध्ये पखतून्सच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला होता. या मॅचमध्ये मराठा अरेबियन्सनं १० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून ७८ रन केले होते. ७९ रनचा पाठलाग करताना नॉर्थन वॉरियर्सनं एकही विकेट न गमावता ५ ओव्हरमध्येच विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या क्वालिफायरमध्ये नॉर्थन वॉरियर्सना हरवून पखतून्सनं फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर नॉर्थन वॉरियर्सनं क्वालिफायर-२ आणि क्वालिफायर-३ चे विजेते मराठा अरेबियन्सना हरवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला. त्याआधी मराठा अरेबियन्सनं बंगाल टायगर्सना ७ विकेटनं हरवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश मिळवला होता.


एलिमिनेटर मॅचमध्ये टॉस जिंकून नॉर्थन वॉरियर्सचा कर्णधार डॅरेन सॅमीनं पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अरेबियन्सची सुरुवात चांगली झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये हजरतउल्ला जजाई आणि ऍलेक्स हेल्सनं १६ रन केले. यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अरेबियन्सच्या विकेट जायला सुरुवात झाली आणि पूर्ण टीमला १० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून ७२ रन करता आले. जजाईनं सर्वाधिक १५ रन केले यानंतर कर्णधार ड्वॅन ब्राव्होनं १३ रनची खेळी केली. दुसऱ्या कोणत्याच खेळाडूला दोन आकडी स्कोअरही करता आला नाही. नॉर्थन वॉरियर्सच्या हार्डस विल्जोएननं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. त्यालाच मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


पूरन आणि सिमन्सची फटकेबाजी


नॉर्थन वॉरियर्ससाठी निकोलास पूरन आणि लिंडल सिमन्स यांनी जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी मिळून ५ ओव्हरमध्येच ७४ रन करून टीमला फायनलमध्ये पोहोचवलं. सिमन्सनं १४ बॉलमध्ये ३१ रन केले तर पूरननं १६ बॉलमध्ये ४३ रनची शानदार खेळी केली.


मागच्यावर्षी सुरु झालेली टी-१० सुपर लीग क्रिकेटमधला नवा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत दोन्ही टीममध्ये १०-१० ओव्हरची मॅच होते. ही मॅच फक्त दीड तास चालते. मागच्यावर्षी शारजाहमध्ये ६ टीममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी टी-१० लीगमध्ये ८ टीम सहभागी झाल्या आहेत. आयोजकांनी यावर्षी स्पर्धेत भाग घेतलेल्या टीमची फी ४,००,००० डॉलरऐवजी १.२ मिलियन डॉलर केली होती.


टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.