T20 World Cup: सर्व बदललं, पण हे 3 खेळाडू आजही खेळताय, यादीत दोन भारतीय खेळाडू
2007 ते 2022 टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, हे तीनही खेळाडू आजही आहेत संघात...
T20 World Cup: क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे ती उद्यापासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची ऑस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला आहे. 2007 साली पहिली टी20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2007) रंगली होती. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत पहिल्या टी20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं. गेल्या पंधरा वर्षात बरंच काही बदललं. 2007 साली खेळलेल्या सर्वच संघातील खेळाडू जवळपास बदलले आहेत. पण तीन खेळाडू असे आहेत, जे 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेले आणि आता 2022 च्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यांचा समावेश आहे. या यादीत दोन भारतीय खेळाडूही आहेत.
हे तीन खेळाडू आजही आहेत कायम
यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma), दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हे तीन खेळाडू खेळताना दिसणार आहेत. 2007 च्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही हे तीन खेळाडूंचा आपापल्या संघात समावेश होता. यंदा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर या तीन खेळाडूंची कामगिरी चाहत्यांना पहायला मिळणार आहे.
धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध
यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतातर्फे सर्व टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचा मान रोहितला जातो. रोहित टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 33 सामने खेळला असून यात त्याने 847 धावा केल्या आहेत. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणारा टीम इंडिया यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे दिनेश कार्तिकही चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या काही सामन्यात बेस्ट फिनिशर म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
बांगलादेश संघाचा कर्णधारही सज्ज
दुसरीकडे 2007 मध्ये खेळलेला बांगलादेशचा शाकिब अल हसन यंदाच्या स्पर्धेतही खेळताना दिसणार आहे. बांगलादेश संघाची धुरा शाकिबच्या खांद्यावर आहे. शाकिबने टी20 वर्ल्ड कपच्या 31 सामन्यात 698 धावा केल्या आहेत. तर 41 विकेटही त्याच्या नावावर जमा आहेत.