T20 World Cup : या दिग्गज खेळाडूंचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप, टीम इंडियातल्या 4 खेळाडूंचा समावेश
या खेळाडूंसाठी ठरू शकते शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, कारण...
T20 World Cup 2022: बरोबर दोन आठवड्यांनी क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी20 क्रिकेट वर्ल्ड कपची (T20 World Cup) उत्सुसता जगभरातील क्रिकेट प्रेमींना लागली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलिया ही गतविजेती आहे. त्यामुळे जेतेपद कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाही जोरदार प्रयत्न करेल. या स्पर्धेत यंदा एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत.
पण ही टी20 वर्ल्ड कप स्पर्धा काही खेळाडूंसाठी शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा ठरू शकते. यात भारतीय विकेटकीपर दिनेश कार्तिक, स्पीन गोलंदाज आर अश्विन, अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच यांचा समावेश आहे. (Last T20 World Cup Of 5 Players)
दिनेश कार्तिकचा शेवटचा वर्ल्ड कप
37 वर्षीय दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात (Team India) आपली जागा बनवली आहे. IPL रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) खेळताना त्याने बेस्ट फिनिशरची भूमिक बजावली होती. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) असतानाही दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला. अशा स्थितीत कार्तिकला संधीचे सोने करून संघाला विजेतेपद मिळवून देऊन शेवटचा वर्ल्ड कप संस्मरणीय बनवायचा आहे.
अश्विनही करु शकतो अलविदा
भारतीय संघातील सर्वोत्तम आणि अनुभवी स्पीन गोलंदाज आर अश्वीन (R Ashwin) आता 36 वर्षांचा झाला आहे. पुढचा टी20 वर्ल्ड कप 2024मध्ये होणार आहे. अशात अश्विनच्या वयाचा विचार करता त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. कसोटी (Test Cricket) आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी (ODI Cricket) अश्विन टी20 क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत अनुभावाच्या जोरावर अश्विनला संघात संधी देण्यात आली आहे.
मोहम्मद नबी चाळीसच्या घरात
अफगाणिस्तानचा (Afghanistan) कर्णधार आणि स्पीन गोलंदाज मोहम्मद नबी (Mohammad Nabi) येत्या 1 जानेवारीला 38 वर्षांचा होईल. त्यामुळे नबीचाही हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही टी20 वर्ल्ड कप स्पर्धा संस्मरणीय करण्याचा नबीचा प्रयत्न असेल. अफगाणिस्तानला कोणताही संघ हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. एशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानने बलाढ्य संघांना दणका दिला होता.
शाकिबचा शेवटचा टी20 वर्ल्ड कप
35 वर्षांचा शाकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) खांद्यावर बांगलादेश (Bangladesh) संघाची धूरा आहे. एशिया कप स्पर्धेत बांगलादेशला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाका करण्याच्या इराद्याने शाकिब अल हसनचा बांगलादेश संघ उतरेल. आपल्या नेतृत्वात चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी शाकिब अल हसनवर असेल. कारण ही त्याची शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा ठरू शकते.
अॅरोन फिंच घरच्या मैदानावर खेळणार शेवटची स्पर्धा
या यादीतलं आणखी एक मोठं नाव म्हणजे ऑस्ट्रेलियाचा (Australia) कर्णधार अॅरोन फिंच (Aron Finch). टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतनंतर काही दिवसांनीच म्हणजे 17 नोव्हेंबरला फिंज वयाची 36 वर्ष पूर्ण करेल. त्यामुळे वयाचा विचार करता अॅरोन फिंचसाठीदेखील ही शेवटची टी20 वर्ल्ड कप स्पर्धा ठरु शकते. आपल्या संघाला सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून देण्यासाठी फिंचचा प्रयत्न असेल. यासाठी त्याची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांच्यात देशात ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा ऑस्ट्रेलिया संघाला मिळणार आहे.
या खेळाडूंचाही असू शकतो शेवटचा वर्ल्ड कप
कार्तिक, अश्विन, नबी, शाकिब आणि फिंच यांच्याव्यतिरिक्त या स्पर्धेत असे आणखी काही खेळाडू आहेत ज्यांची ही शेवटची स्पर्धा ठरू शकते. या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), वेगवाग गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami), इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अली (Moin Ali), डेविड मलान (David Malan), आदिल राशिद (Adil Rashid) ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) समावेश आहे. या सर्वांचं वय जवळपास 35 च्या आसपास आहे.