`आपको अपना दिमाग...`, रोहित शर्मा इंझमामवर भडकला; बॉल टॅम्परिंगच्या आरोपांवरुन झापलं
T20 World Cup 2024 Rohit Sharma Reply To Inzamam Ul Haq: भारताने सुपर 8 च्या फेरीमधील आपल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यामध्ये अर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या.
T20 World Cup 2024 Rohit Sharma Reply To Inzamam Ul Haq: भारत आणि इंग्लंडदरम्यान होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी-फायनलच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल-हकने केलेला एक धक्कादायक आरोप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर इंझमामने गंभीर आरोप केलेत. अर्शदीपला चेंडू रिव्हर्स स्वींग करता येण्यामागी काहीतरी गौंडबंगाल असल्याचा दावा इंझमामने केला आहे. बॉलबरोबर काहीतरी छेडछाड केल्याशिवाय तो एवढा रिव्हर्स स्वींग होणार नाही, अशी शंका इंझमामने बोलून दाखवली. म्हणजेच अर्शदीपने जाणूनबुजून चेंडू कुरतला किंवा त्याचा आकार बदलण्याचा प्रयत्न करुन द्या माध्यमातून स्वींगसाठी मदत मिळवल्याचं इंझमामचं म्हणणं आहे. मात्र यासंदर्भातील कोणताही पुरावा किंवा इतर संदर्भ इंझमामने दिलेला नाही. अशातच आता इंझमामच्या या बिनबुडाच्या आरोपावरुन भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याला जशास तसं उत्तर दिलं आहे.
इंझमाम नेमकं काय म्हणाला?
"अर्शदीप सिंगने टाकलेला बॉल 15 व्या ओव्हरला रिव्हर्स स्विंग होत होता. नवा चेंडू कधीच इतक्या लवकर रिव्हर्स स्विंग होत नाही. याचा अर्थ बॉल रिव्हर्स स्विंग व्हावा यासाठी 12 व्या किंवा 13 व्या ओव्हरदरम्यान बॉलशी छेडछाड करण्यात आली होती. म्हणूनच सामन्यादरम्यान अम्पायर्सनी त्यांचे डोळे उघडे ठेवायला हवेत," असं इंझमामने पाकिस्तानमधील, '24 न्यूज'शी बोलताना सांगितलं.
"पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या बाबतीत असं झाले असते, तर त्यावरुन बरीच चर्चा आणि वाद निर्माण झाला असता. जर अर्शदीपचा चेंडू 15 व्या षटकात रिव्हर्स स्विंग होत असेल, तर चेंडूशी काहीतरी छेडछाड नक्कीच करण्यात आली आहे," असंही इंझमाम पुढे म्हणाला. 'बुमराह असा रिव्हर्स स्वींग करत असेल तर समजू शकतो कारण त्याची गोलंदाजी करण्याची पद्धत तशी आहे. मात्र काही ठराविक शैलीत गोलंदाजी करणाऱ्यांचा बॉल रिव्हर्स स्वींग होत असेल तर नक्कीच बॉलबरोबर छेडछाड करण्यात आल्याच्या शंकेला वाव आहे,' असं इंझमाम म्हणाला.
या आरोपांवर रोहित काय म्हणाला?
इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधताना त्याला इंझमामने केलेल्या आरोपांवरुन प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून रोहित शर्माने, 'अभी क्या जवाब दूं इसका भाई' असा वैतागलेल्या स्वरात पत्रकारालाच प्रतिप्रश्न केला. "खेळपट्टी कोरडी आहे. तुम्ही उष्ण वातावरणात खेळत आहात. सर्वच संघांना रिव्हर्स स्वींग मिळत आहे. हे काही ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड नाही, याचं भान ठेवलं पाहिजे," असा खोचक टोला रोहितने इंझमामला लगावला. पुढे बोलताना रोहितने, "आपको अपना दिमाग खुला रखने की जरूरत है," असंही म्हटलं. म्हणजेच कधीतरी आपल्या मेंदूला चालना देत विचारांच्या कक्षा रुंदावण्याची गरज असते, असं रोहितने इंझमामला सुचवलं.
अर्शदीपने घेतल्या 3 विकेट्स
भारताने सुपर 8 च्या फेरीमधील आपल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला 24 धावांनी पराभूत केलं. या सामन्यामध्ये अर्शदीपने 3 विकेट्स घेतल्या. 206 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 7 बाद 181 पर्यंत मजल मारु शकला.
भारतासाठी डोळे बंद ठेवल्याचाही आरोप
दरम्यान, इंझमाममध्ये चर्चेत सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या अन्य एका माजी कर्णधारानेही भारतावर टीका केली आहे. "असं म्हणतात की, अम्पायर्स काही संघांसाठी डोळे कायम बंदच ठेवतात आणि भारत त्यापैकी एक आहे. मला आठवतं की एकदा याबद्दल तक्रार केल्यानंतर यासाठी दंड ठोठावण्यात आला होता," असं याच कार्यक्रमात सहभागी झालेले पाकिस्तानचे माजी कर्णधार सलीम मलिक यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा खेळाडू असता तर पंचांनी टोकाची भूमिका घेतली असती, असंही इंझमाम म्हणाला.