विराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने (Team India) सलग तीन विजय मिळवत ग्रुप ए मधून सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात यजमान अमेरिकेचा 7 विकेट राखून पराभव केला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंटरनॅशन क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिली फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेला निर्धारित 20 षटकात 8 विकेट गमावत केवळ 110 धावा करता आल्या. विजयाचं हे आव्हान सोपं वाटत होतं. पण टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली. विराट कोहली आणि रोहित शर्माने भारतीय डावाची सुरुवात केली. पण रनमशीन विराट कोहली (Virat Kohli) भोपळा न फोडताच पॅव्हेलिअनमध्ये परतला.
सौरभ नेत्रावलकरची भेदक गोलंदाजी
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने (Saurabh Netravalkar) पहिल्याच षटकात विराट कोहलीची ड्रीम विकेट घेतली. विशेष म्हणजे टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आतापर्यंत तीन सामने खेळलीय. तिन्ही सामन्यात विराट कोहलीने सलामीला फलंदाजी केली आणि तीनही सामन्यात विराट कोहली स्वस्तात बाद झाला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली एक धावेवर बाद झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला केवळ चार धावा करता आल्या. तर अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात चक्क शुन्यावर बाद झाला.
टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम
अमेरिकेविरुद्ध शुन्यावर बाद होत विराट कोहलीने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयसीसी स्पर्धेत गोल्डन डकवर बाद होण्याची विराट कोहलीची ही पहिलीच वेळ आहे. तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तो सहाव्यांदा शुन्यावर बाद झालाय.
सलामीला ठरतोय सुपरफ्लॉप
टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहली सलामीला सुपर फ्लॉप ठरतोय. टीम इंडियात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. तिसऱ्या क्रमांकावर त्याची कामगिरीही दमदार आहे. असं असतानाही टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला सातत्याने सलामीला पाठवलं जात आहे. लीगमध्ये हा प्रयोग अपयशी ठरलाय. पण सुपर-8 मध्ये बलाढ्य संघ समोर असणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाला हा प्रयोग कदाचित महाग पडू शकतो.
यशस्वी जयस्वालला संधी मिळणार?
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये आहेत. पण त्याला टी20 वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना खेळवण्यात आलेला नाही. त्याच्या जागी विराट कोहलीला सलामीला पाठवलं जात आहे. पण हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडतोय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम व्यवस्थापनेला यावर पर्याय शोधावा लागणार आहे. कारण सुपर-8 मध्ये एक चुक टीम इंडियाला महागात पडू शकते.