टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाचं लक्ष लागलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. पण तो यावेळी चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. विराट कोहलीची बॅट नेहमीप्रमाणे तळपत नसून टी-20 मध्ये त्याला संघर्ष करावा लागत आहे. 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली या वर्ल्डकपमध्ये मात्र अयशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघासमोर तुलनेने दुबळे संघ असतानाही विराट कोहली चार सामन्यात फक्त 29 धावा करु शकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या अयशस्वी खेळींमागे न्यूयॉर्मकधील मैदानं जबाबदार असल्याचे दावे केले जात होते. न्यूयॉर्कमधील मैदानं फलंदाजांसाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जात होतं. विराट कोहलीने तेथील सामन्यांमध्ये 1,4 आणि 5 अशा धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये त्याचा धावांचा दुष्काळ संपेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण तिथेही फारसा बदल झाला नाही. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने फक्त 24 धावा केल्या. 


सुपर 8 साखळीत अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली फॉर्ममध्ये दिसत होता. नवीन उल-हकच्या गोलंदाजीवर त्याने लगावलेल्या षटकाराने अनेकांना पाकिस्तानविरोधातील सामन्याची आठवण झाली. दरम्यान विराट कोहलीवर टीका होत असताना दुसरीकडे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने मात्र त्याची पाठराखण केली आहे. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यातील खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल असं लाराने म्हटलं आहे. 


"24 चेंडूत 24 धावा ही काही महान कामगिरी नाही. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याने मैदानावर वेळ घालवला. भारतीय संघ आता ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. मला वाटतं की, विराट कोहलीच्या क्षमतेत आता वाढ होत जाईल. तो पुढे अँटिग्वाला जाणार आहे, तुम्ही त्याला तिथे धावा करताना पाहाल,” असं लाराने स्टार स्पोर्ट्सवर सांगितलं. 


आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली होती. तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मासह सलामीचा जोडीदार म्हणून यशस्वी जैस्वालच्या जागी कोहलीला पसंती दिली. पण अजून तरी हा निर्णय योग्य सिद्ध झालेला नाही. त्याची कामगिरी पाहता अनेकांनी निर्णयावर प्रश्नचिन्ह उभारण्यास सुरुवात केली आहे. 


लाराचं मत मात्र यापेक्षा वेगळं आहे. विराट कोहलीसारख्या खेळाडूसाठी संयम बाळगायला हवा. तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे आणि स्पर्धेत अजूनही पुरेसे खेळ शिल्लक आहेत जिथे भारताला त्याची आवश्यकता असेल असं लाराचं म्हणणं आहे. लाराने सांगितलं आहे की, "जेव्हा तो पूर्ण फॉर्मात असेल तेव्हा ती वेगळी बाब असेल. आपल्याला त्याच्याबाबतीत फार संयमी असायला हवं. अजून बरेच सामने शिल्लक असून त्यात त्याची खेळी पाहायला मिळेल".