T20 World Cup Final: चॅम्पियन इंग्लंडवर पैशांचा पाऊस, तर पाकिस्तानला इतके कोटी... टीम इंडियालाही बक्षीस
पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली, विजयानंतर इंग्लंड संघाला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस
T20 World Cup: जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वाखाली इंग्लंडने (England) दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. अंतिम फेरीत इंग्लंडने पाकिस्तानवर (England Defeat Pakistan) 5 विकेटने मात टी20 वर्ल्ड कपची ट्ऱ़ॉफी उंचावली. 2010 मध्ये पॉल कॉलिंगवूडच्या (Paul Collingwood) नेतृत्वात इंग्लंडने पहिल्यादा टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं होतं. आता 12 वर्षांनी पुन्हा एकदा इंग्लंडने ती किमया साधली. सॅम कुरेन (Sam Curran), जॉर्डनची (Chris Jordan) भेदक गोलंदाजी आणि बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) संयमी फलंकदाजीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानला नमवलं.
इंग्लंडची भेदक गोलंदाजी
सॅम कुरेन, क्रिस जॉर्डन, आदिल रशीद (Adil Rashid) आणि बेन स्टोक्सने दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव आणला. महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले आणि अखेर 8 विकेट गमावत त्यांना केवळ 137 धावा करता आल्या. कुरेनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर आदिल आणि जॉर्डरने प्रत्येकी दोन विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.
बेन स्टोक्सची संयमी फलंदाजी
विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. अॅलेक्स हेल्स आणि फिल साल्ट झटपट बाद झाले. पण त्यानंतर बेन स्टोक्सने कर्णधार जोस बटलरला मोलाची साथ दिली. बटलर 26 धावा काढून बाद झाला. पण स्टोक्सने अत्यंत संयमी फलंदाजी करत मैदानावर तळ ठोकला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीला चोख उत्तर देत त्याने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्टोक्सने नाबात 52 धावा केल्या. यात त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला. याच जोरावर इंग्लंडलने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली. 2019 मध्ये इंग्लंडने वन डे वर्ल्ड कपही जिंकला होता.
चॅम्पियन इंग्लंडवर पैशांचा पाऊस
टी20 वर्ल्ड कप पटकावणाऱ्या इंग्लंडवर पैशांचा पाऊस पडला. चकाकत्या ट्रॉफीबरबर इंग्लंडला तब्बल 13 कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं. याशिवाय अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या पाकिस्तान संघाला 6.44 कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं. सेमीफायनलमधल्या भारत आणि न्यूझालंड संघालाही प्रत्येकी 3.22 कोटी रुपये मिळाले.