`हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...`, T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला
पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानचे खेळाडू पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने आणखी एका आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. पाकिस्तान संघ भारतासाठी ग्रुप A मध्ये होता. या गटातून भारत आणि अमेरिका सुपर 8 साठी पात्र झाली आहे.
पाकिस्तान संघाला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेसारख्या नवख्या आणि दुबळ्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अमेरिकेविरोधात सुपर ओव्हरमध्ये सामना गमावल्यानंतर भारताविरोधातील सामन्यातही त्यांनी पुन्हा एकदा पराभवाची धूळ चाखली. कॅनडाविरोधातील सामना जिंकत अखेर त्यांनी विजयाचं खातं उघडलं होतं. पण आयर्लंड आणि अमेरिका सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर मात्र त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.
पाकिस्तानने ग्रुप स्टेजमधील आपला आयर्लंडविरोधातील अखेरचा सामना जिंकत थोडीशी लाज राखली. पण आयर्लंडविरोधात संघ सपशेल अपयशी ठरला होता. पराभवानंतर बाबरने संघाच्या फलंदाजीने नाराज केल्याचं स्पष्ट म्हटलं होतं. इंझमाम उल-हकने निवडकर्त्यांनी मधल्या फळीसाठी योग्य फलंदाजांतची निवड न केल्याने टीका केली आहे.
'पाकिस्तानला मधल्या फळीतील फलंदाज न सापडणं लाजिरवाणी बाब'
"ज्याप्रकारे खेळाडूंची निवड झाली आहे, तशी निवड नको व्हायला हवी होती. पहिल्यापासून ते पाचव्या क्रमांकापर्यंत सगळे ओपनर्सच खेळत आहेत. पाकिस्तान संघात मधल्या फळीतील फलंदाजच नाही. संपूर्ण पाकिस्तानात मधल्या फळीतील फलंदाजच नाही, ज्याची निवड करु शकतो ही फार लाजिरवाणी बाब आहे," असं इंझमाम उल-हक म्हणाला आहे.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर झालेल्या अ गटातील अंतिम सामन्यात पाकिस्तानने आयर्लंडला 106 धावात रोखलं होतं. 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची स्थिती 11 ओव्हर्समध्ये 62-6 अशी झाली होती. बाबर आझमने 34 चेंडूत नाबाद 32 धावा करून आयर्लंडचा तीन गडी राखून पराभव केला.
'पाकिस्तान कधीच टॉपला आणि एकत्र नव्हता'
"हा संघर्ष फक्त T20 वर्ल्डकपपुरता मर्यादित नाही. आशिया चषकातही त्यांनी असाच संघर्ष केला. आशिया चषक झाला, एकदिवसीय विश्वचषक झाला. त्यानंतर 2-3 मालिकेतही पाकिस्तान आघाडीवर आणि एकत्र नव्हता. तुम्ही फक्त वैयक्तिक कामगिरी बघू शकता, कधी बाबरकडून, तर कधी शाहीनकडून. तुम्ही त्यांना एक युनिट म्हणून काम करताना पाहिले नाही," अशी खंत इंझमाम उल-हकने मांडली आहे.