Virat Kohli Six: विराटच्या `त्या` दोन Six चा होणार लिलाव, इतिहासात झाली नोंद
टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी
Virat Kohli Six : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खेळला गेलेला तो सामना करोडो क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहिल. विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्ध केलेली खेळी इतिहासात नोंदवली जाईल. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर रंगला. या सामन्यात ड्रामा, थ्रील, अॅक्शन सर्व काही होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 4 विकेटने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. (India beat Pakistan by 4 Runs)
विराट कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली. यात काही लाजबाब फटकेही त्याने मारले. पण यातले दोन फटके असे होते ज्याची क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या (Haris Rauf) षटकात विराट कोहलीने मारलेल्या दोन सिक्सने सामन्याचा रूखच पालटला. इथेच सामना भारताच्या बाजूने वळला.
2003 मध्ये सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) मारलेला सिक्स क्रिकेटप्रेमींच्या मनात कायचमा कोरला गेला. 2011 मध्ये एमएस धोणीने (MS Dhoni) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) सिक्स ठोकत भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. हा सिक्सही भारतीय क्रिकेटप्रेमी अजून विसरलेले नाहीत. या यादीत आता विराट कोहलीने रौफला लगावलेल्या त्या दोन सिक्सचा समावेश झाला आहे.
विराटची ऐतिहासिक खेळी
भारताला विजयासाठी 12 चेंडूत 31 धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझमने (Babar Azam) चेंडू वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या हातात सोपवला. पहिल्या चार चेंडूत रौफने केवळ 3 धावा दिल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 8 चेंडूत 28 धावांची गरज होती. पण त्या षटकातील शेवटच्या दौन चेंडूवर विराटने जे केलं ते इतिहासात नोंदवलं गेलं.
18.5 ओव्हर : एकोणीसव्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने लगावलेला सिक्स टी20 कारकिर्दीतील कदाचित सर्वोत्तम सिक्स होता. विराटने गोलंदाजाच्या डोक्यावरुन सरळ रेषेत चेंडू सिमापार धाडला. हा सिक्स यासाठी खास ठरतो कारण विराटने पूर्ण ताकद न लावता बॅट सरळ ठेवत केवळ मनगटाच्या जोरावर चेंडू टोलावला.
18.6 ओव्हर : रौफने षटकातला शेवटचा चेंडू थोडासा आखूड टप्प्यावर टाकला. ऑफच्या दिशने जात विराटने चेंडू लेगच्या दिशेने फ्लिक केला आणि थेट सीमापार पाठवला. सलग दोन सिक्सने सामना भारताच्या बाजूने झुकला.
ते दोन सिक्स ठरले खास
विराटने लगावलेले हे सिक्स आणखी एका कारणासाठी खास ठरले आहेत. कारण हे सिक्स आता चक्क विकले जाणार आहेत. आयसीसीने क्रिकेट चाहत्यांसाठी खास योजना तयार केली आहे. ज्यामुळे क्रिकेट चाहते एखाद्या सामन्यातील आपला आवडता क्षण डिजिटल कलेक्शन रुपात जपून ठेवू शकतात. याचअंतर्गत विराट कोहलीने मारलेले या सिक्सचा लिलाव होणार आहे. त्यावर बोली लावत क्रिकेट चाहते ते क्षण डिजिटल रुपात कायमचे आपल्याबरोबर ठेऊ शकतात.