आयपीएलनंतर (IPL) लगेच टी-20 वर्ल्डकप होणार असून बीसीसीआयकडे संघ निवडण्यासाठी 1 मेपर्यंतची डेडलाईन आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. सध्या विकेटकिपरसाठी के एल राहुल, ऋषभ पंत यांच्यात चुरशीची लढत आहे. दुसरीकडे संजू सॅमसनही (Sanju Samson) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण त्याला पुन्हा एकदा डावललं जाणार असल्याची चर्चा आहे. पण शनिवारी लखनऊविरोधातील सामन्यात आपल्या जबरदस्त नेतृत्व आणि फलंदाजीने त्याने निवड समितीला विचार करण्यास भाग पाडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी खेळाडू केविन पीटरसननेही संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळावं यासाठी परखडपणे आपलं मत मांडलं आहे. लखनऊविरोधात 197 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने यश ठाकूरला विजयी षटकार ठोकला. स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना केविन पीटरसनने बीसीसीआयचे निवडसमिती प्रमुख अजित आगरकरला वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या अमेरिकेच्या विमानात संजू सॅमसन असला पाहिजे असं सांगितलं आहे. 


"त्याला जावंच लागेल. काही आठवड्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजसाठी उड्डाण करणाऱ्या विमानात तो असला पाहिजे याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. त्याच्यावर फार दबाब असून, तो संघाचं नेतृत्वही करत आहे. पण त्याला अपेक्षित सन्मान मिळत नाही आहे. तो ज्याप्रकारे धावा करत आहे आणि ज्या परिस्थितीत फलंदाजी करत आहे ते पाहता मी सिलेक्टर असतो तर आधी त्याला निवडलं असतं," असं स्पष्टपणे पीटरसनने सांगितलं आहे.


भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्व परीक्षा संजू सॅमसनने यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करताना, तो फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करत आहे. शनिवारी त्याने 33 चेंडूत 71 धावा कुटल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 4 षटकार ठोकले. यासह संजू सॅमसनने या हंगामात एकूण 385 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2024 मधील सर्व भारतीय विकेटकीपिंग पर्यायांमध्ये तो केवळ आघाडीवर नसून सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे.


BCCI निवडकर्ते आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी टी-20 वर्ल्डकप संघ निवडण्यासाठी नवी दिल्ली येथे भेटणार आहेत. दोन विकेटकीपिंग स्पॉट्सच्या आसपासच्या चर्चेत ऋषभ पंत आणि केएल राहुल देखील पर्याय म्हणून विचारात आहेत. या बैठकीनंतर लवकरच भारतीय संघाची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. क्रिकेट चाहत्यांनाही भारतीय संघ कसा असेल याची उत्कंठा आहे.