टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान संघाने अत्यंत लाजिरवाणी कामगिरी केली असून, सुपर 8 साठी पात्र न होता बाहेर पडला आहे. अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पावसा सामनामुळे रद्द झाल्याने अमेरिकेला एक गुण मिळाला. यामुळे पाकिस्तान संघ अपात्र ठरला आणि वर्ल्डकप जिंकण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं. पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर माजी महान गोलंदाज शोएब अख्तरने पोस्ट शेअर करत आपली नाराजी जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब अख्तरने एक्सवर फक्त एका वाक्यातील पोस्ट शेअर केली आहे. 'पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील प्रवास संपला', असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 



आयर्लडने जर अमेरिकेचा पराभव केला असता तर पाकिस्तानचं वर्ल्डकपमधील आव्हान जिवंत राहिलं असतं. यासह त्यांना ग्रुप स्टेजमधील आयरिशविरोधीतल अखेरचा सामना खेळण्याची संधी होती. पण पावसाने पाकिस्तानच्या स्वप्नावर पाणी ओतलं. 


जरी पाकिस्तानचा सामना अनिर्णित राहिला असता तरी ते फक्त चार गुणांपर्यंत पोहोचू शकतले असते. दरम्यान, यूएसएने चार सामन्यांतून पाच गुणांसह ग्रुप लीग मोहीम संपवली आणि अ गटातून भारतासह पुढील फेरीत प्रवेश केला. 


पाकिस्तानची वर्ल्डकपची सुरुवातच निराशेत झाली होती. पहिल्या सामन्यात अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर झालेल्या भारताविरोधातील सामन्यात ते 120 धावांचं माफक आव्हानही पूर्ण करु शकले नव्हते. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तान संघाची सुपर 8 साठी पात्र होण्याची संधी अशीही कमीच झाली होती. त्यांच्याकडे इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत सुरु असलेल्या पावसाने त्यांच्या वाटचालीला पूर्णविराम दिला. 


दुसरीकडे अमेरिकेने वर्ल्डकपमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कॅनडाविरोधीताल सामन्यात 200 धावांचा पाठलाग केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारतीय संघाला त्यांनी चांगलंच आव्हान दिलं होतं. यूएस संघात भारतीय वंशाच्या आठ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेकजण तात्पुरत्या H1-B व्हिसावर आहेत जे कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याची परवानगी देतात.