T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर आलेली असतानाही भारतीय संघ अद्याप काही निर्णय घेऊ शकलेला नसून प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत. आघाडीला फलंदाजी करण्यासाठी यशस्वी जैसवाल, रोहित शर्मा आणि विराट कोहली अशी तिघांची नावं समोर आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये आघाडीला फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विराट कोहलीला पहिल्या क्रमांकावर पाठवावं की तिसऱ्या याबाबत प्रशिक्षक आणि कर्णधाराला निर्णय घ्यायचा आहे. तर दुसरीकडे नेमक्या कोणत्या गोलंदाजांना खेळवावं हादेखील मोठा प्रश्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकच्या मैदानावर खेळण्याचा भारताला फारसा अनुभव नाही. ग्रुप स्टेजच्या आधी भारत फक्त एक सामना खेळणार आहे. दरम्यान भारत फलंदाजी मजबूत करण्यासाठी यशस्वी आणि शिवम दुबे यांना संघात संधी देण्याची शक्यता आहे. पण यामुळे गोलंदाजी दुबळी होण्याची भीती आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून वापरलं जाऊ शकतं. यावेळी शिवम दुबेकडे फार अनुभव नसल्याने भारतीय संघाला त्याचा फटका बसू शकतो. भारताकडे अतिरिक्त गोलंदाज नसणं गोष्टी अवघड करु शकतात. 


हार्दिक पांड्याला संघात संधी देण्यात आली असली तरी आयपीएलमध्ये तो फारशी चांगली कामगिरी करु न शकल्याने चिंतेची बाब आहे. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार असून, संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहून बाहेर पडला आहे. आयपीएलमध्ये 14 सामन्यात तो फक्त 216 धावा करु शकला होता. यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याची पाचवा गोलंदाज म्हणून निवड करण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. 


''हार्दिक पांड्या तुमचा पाचवा गोलंदाज असू शकत नाही. हार्दिक पांड्याने केलेली गोलंदाजी आणि फिटनेस पाहता तो सहावा पर्याय असायला हवा. म्हणून, मला फिरकीवर जास्त भर द्यावा असं वाटत आहे. कारण जेव्हा तुम्ही भारताच्या मध्यमगी गोलंदाजीचा दर्जा पाहता तेव्हा त्यात जास्त मजबूतपणा नसतो," असं संजय मांजरेकर म्हणाले आहेत. 


जर मोहम्मद शमी भारतीय संघात असता तर परिस्थिती वेगळी असती असंही त्यांनी म्हटलं आहे. पण मोहम्मद शमी जखमी असल्याने संघाबाहेर असून भारतीय संघाची चिंता वाढवली आहे. मोहम्मद शमीच्या गुडघ्याची सर्जरी झाली असून, यामुळे तो आयपीएलही खेळू शकलेला नाही. 


"जर मोहम्मद शमी असता तर भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले असते. तुमच्याकडे फिरकीचे काही चांगले पर्याय आहेत, त्यामुळे मी अतिरिक्त फिरकी गोलंदाजांसोबत खेळणं जास्त पसंत करतो," असं तो पुढे म्हणाला. 


भारतीय संघ शनिवारी संध्याकाळी बांगलादेश विरुद्ध न्यूयॉर्कमधील नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सराव सामना खेळणार आहे. 5 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या गट टप्प्यातील लढतीपूर्वी सर्व खेळाडूंचे संयोजन अंतिम करण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडे पाहण्याची शेवटची संधी आहे.