Ind vs Eng : भारताच्या पराभवानंतर Oreoवर बंदी घालण्याची मागणी का होतेय?
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे
Ind vs Eng : आयसीसी (ICC) स्पर्धेत पुन्हा एकदा टीम इंडियाचे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या (T20 world cup) सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे रोहित शर्मालाही भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. 2013 मध्ये, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटची आयसीसीची (ICC) स्पर्धा जिंकली होती. टी-20 विश्वचषकातील या लाजिरवाण्या पराभवानंतर, भारतीय चाहते पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण काढत आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. यासोबतच सोशल मीडियावर (Social Media) ओरीओ (Oreo) बिस्किटही ट्रेंड होत आहे. भारताच्या पराभवानंतर ओरिओसोबत महेंद्रसिंह धोनीवरही निशाणा साधला जात आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धोनीने ओरिओ बिस्किट पुन्हा लॉन्च केले होते.
यादरम्यान धोनीने म्हटले होते की, "ओरिओ देखील 2011 मध्ये लॉन्च केले गेले आणि त्यानंतर भारताने वर्ल्ड कप जिंकला. जर ओरिओ पुन्हा लॉन्च झाल्यास भारत वर्ल्ड कप जिंकेल." ओरिओच्या कार्यक्रमात, '2011 मध्ये ओरिओ लॉन्च करण्यात आले तेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्षी आणखी एक कप आहे. जर ओरिओ पुन्हा लॉन्च करण्यात आले, तर भारत पुन्हा वर्ल्ड कप जिंकू शकतो. त्यामुळे ओरिओ पुन्हा लॉन्च करण्यात यावे, असे धोनीने म्हटले होते.
मात्र आता इंग्लंडकडून पराभव झाल्यामुळे भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. यावरुन आता ओरिओ आणि महेंद्रसिंह धोनीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी ओरिओला ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे. झोमॅटोने ट्विट करत, 'ओरिओ भजीची चव या पराभवापेक्षा अधिक चांगली असती,' असे म्हटले आहे. तर @deeppant2 नावाच्या युजरने, 'दुर्दैवाने ओरिओ बिस्किटांची जाहिरात करताना धोनी विसरला की तो सध्याच्या संघात नाही. धोनीच्या कर्णधारपदाची उणीव जाणवतेय, असे म्हटले आहे.
दरम्यान, इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी दमदार फलंदाजी करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. भारताने 20 षटकात 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 16व्या षटकातच 170 धावा केल्या.