भारतीय संघ सध्या टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत आहे. मात्र यादरम्यान भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, यामुळेच त्याला भारतात परत पाठवण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसंच त्याने सोशल मीडियावर रोहित शर्माला (Rohit Sharma) अनफॉलो केल्याकडे चाहते लक्ष वेधत आहेत. पण यादरम्यान शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली असून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शुभमन गिलने रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायरासह फोटो शेअर केला आहे. या फोटोतून त्याने आपल्यात आणि रोहित शर्मात काही वाद नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायरा दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "सॅमी (समायरा) आणि मी रोहित शर्माकडून शिस्तीची कला शिकत आहे".


शुभमन गिलसह आवेश खानला भारतात बोलावण्यात आलं आहे.  त्यांच्या भारतात परतण्याबाबत सतत तर्क-वितर्क लावले जात होते. शिस्तभंग केल्यानेच शुभमन गिलला भारतात बोलावण्यात आल्याचे दावे होते. तसंच यामुळे शुभमन गिल रोहित शर्मावर नाराज असल्याचंही बोललं जात होतं. पण टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं असून, आता शुभमन गिलने चाहत्यांच्या मनातील शंका दूर केली आहे. 


IPL 2023 मध्ये ऑरेंज कॅप जिंकूनही, IPL 2024 मध्ये संथ सुरुवातीमुळे त्याला 2024 T20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय संघात निवडण्यात आलं नाही. IPL 2024 च्या अखेरीस गिलने 12 सामन्यांमध्ये 426 धावा केल्या होत्या.


टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये पुरेसे खेळाडू असल्याने शुभमन गिल आणि आवेश खान यांची गरज नाही. या खेळाडूंशिवाय राखीव खेळाडूही आहेत. त्यामुळे शुभमन गिल आणि आवेश खान भारतात परतलं पाठवल्याची माहिती आहे. 


फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याकडून चर्चांना पूर्णविराम


भारतात परत बोलावल्यामुळे गिलने रोहित शर्माला अनफॉलो केलं असल्याचा दावा केला जात असताना भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दोन भारतीय खेळाडूंच्या मायदेशी परतण्याचा निर्णय स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. "सुरुवातीपासूनच आम्ही याबाबत विचार करत होतो. ज्यावेळी आम्ही अमेरिकेत येऊ तेव्हा चार खेळाडू सोबत येतील. त्यानंतर दोघे मायदेशी परततील आणि दोघे आमच्यासोबत वेस्ट इंडिजला जातील, त्यामुळे टीम निवडल्यापासून हीच योजना होती," असं ते म्हणाले.