हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार
T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच (Team India New Jersey Launch) करण्यात आली आहे. धर्मशालाच्या बर्फाच्छित डोंगरामधून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली. टीम इंडियाची नवी जर्सी खूपच आकर्षक आहे. नव्या जर्सीच्या खांद्याला भगवा रंग देण्यात आला आहे. तर जर्सीच्या पुढे निळा रंग आणि त्यावर बीसीसीआयचा (BCCI) लोगो छापण्यात आला आहे. जर्सी लॉन्च करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव दिसतायत.
धर्मशालाच्या मैदानावर टीम इंडियाच्या खेळाडूंचा सराव सुरु असताना मैदानाच्या बाहेरुन हेलिकॉप्टर वर येतं. याला मोठ्या आकाराची जर्सी लटकवण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसतंय. जर्सी पाहून रोहित शर्मा, जडेजा आणि कुलदीपच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसतायत. टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे (Jersey) प्रायोजक आदिदास कंपनी आहे. जर्मनीची ही कंपनी 2028 पर्यंत टीम इंडियाची अधिकृत स्पॉन्सर असणार आहे. यासाठी आदिदास कंपनीने बीसीसीआयबरोबर 350 कोटी रुपयांचा करार केला आहे.
कशी आहे टीम इंडियाची नवी जर्सी
टीम इंडियाची नवी जर्सी व्ही शेप गळ्याची असू यावर भारतीय तिरंग्याचा स्ट्रीप आहे. खांद्यापासून हातापर्यंत भगवा रंग आहे. यावर सफेद पट्ट्या आहेत. जर्सीची पुढची बाजू निळ्या रंगाची असून यावर उजव्या बाजूला आदिदास आणि डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये या नव्यी जर्सीत टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
नवी जर्सी, जिंकण्याचं नवं स्वप्न
नव्या जर्सीसह जिंकण्याचं नवं स्वप्न घेऊन टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. 2013 नंतर टीम इंडिया एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. अकरा वर्षांचा हा दुष्काळ संपवण्याचा रोहित शर्माच्या टीम इंडियाचं स्वप्न असणार आहे. दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयने 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. तर चार खेळाडू राखीव म्हणून असणारआहेत.
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जायसवाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
5 जूनपासून टीम इंडियाचे सामने
टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 जूनपासून टीम इंडियाच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. तर 9 जूनला टीम इंडिया पारंपारिक प्रतिस्पर्धी पारिस्तानशी दोन हात करणार आहे. यानंतर 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध सामना रंगणार आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये 19 जूनपासून सुपर 8 चे सामने रंगतील. तर 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाईल.