दोन पराभवानंतरही Pakistan सेमीफायनलमध्ये पोहोचणार? रॉजर बिन्नी म्हणाले, मला आनंद होईल पण....
पाकिस्तानला सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे त्यामुळे आता गणितं बदलली आहेत
T20 World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी नुकतेच माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केले. कोहलीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर भारताने ( आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट राखून पराभव केला होता. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला झिम्बाब्वेविरुद्ध 1 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानसााठी (Pakistan) उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. झिम्बाब्वेच्या पाकिस्तानवर ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सलग दोन पराभवानंतर शेजारील देशाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल, अशी भविष्यवाणी रॉजर बिन्नी यांनी केली आहे. (T20 World Cup Will PAK reach the semifinals or not prediction of BCCI President Roger Binny)
पाकिस्तानच्या संघासाठी आजचा दिवस का महत्त्वाचा?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बिन्नी म्हणाले की, "ज्युनियर संघ पुढे येत आहेत हे चांगले आहे. या टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वे आणि आयर्लंडने हे सिद्ध केले आहे. तुम्ही यापुढे लहान संघांना हलक्यात घेऊ शकत नाही. ते तुम्हाला सहज हरवू शकतात. मला वाटते की पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे कठीण जाईल. तसे झाले तर मला खूप आनंद होईल, पण क्रिकेट हा एक मजेदार खेळ आहे. तुम्हालाही माहिती नसतं, त्यात कधीही काहीही होऊ शकते."
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला रविवारी म्हणजेच आज नेदरलँड्सविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. 2009 चा चॅम्पियन पाकिस्तान सुपर-12 च्या ग्रुप 2 च्या पॉइंट टेबलमध्ये नेदरलँड्सपेक्षा फक्त वर आहे. त्याचबरोबर या गटात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सलग दोन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. संघाला आज तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे.