सरांचा वारसा पुढे न्या, शरद पवार यांचं आचरेकरांच्या शिष्यांना आवाहन
ज्येष्ठ क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांना आज शिवाजी पार्क जिमखाना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबई : ज्येष्ठ क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांना आज शिवाजी पार्क जिमखाना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. रमाकांत आचरेकर यांचे दोन जानेवारीला निधन झाले होते. त्याच्या निमित्त आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रद्धांजली सभेस क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहीली. यानंतर शरद पवार यांनी आचरेकर यांचे शिष्य असलेल्या क्रिकेटपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन केलं.
रमाकांत आचरेकर सरांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ज्या दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी आयुष्यभर कार्य केलं ती लीगसी त्यांच्या सहकार्यांनी, त्यांच्या शिष्यांनी पुढे न्यायला हवी. हीच त्यांच्याबद्दल खरी कृतज्ञता व त्यांना योग्य श्रद्धांजली राहील!, असं ट्विट शरद पवार यांनी केलं.
जागतिक किर्तीचे खेळाडू घडविणारे आणि पद्मश्री, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे २ जानेवारीला निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. वांद्रे येथील निवास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
आचरेकर यांनी दादरला शिवाजी पार्क येथे कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली. त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटू घडवले. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, चंद्रकांत पंडित, जलगती गोलंदाज अजित आगरकर, डावखूरा फलंदाज विनोद कांबळी, प्रवीण आमरे यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घतले. आचरेकर सरांचा हा क्लब आणि त्यांचे कार्य आता त्यांची मुलगी कल्पना मुरकर हिने सुरु ठेवले आहे. १९९० मध्ये क्रीडा क्षेत्रातला मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले होते.