मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा शानदार विजय झाला. या विजयामुळे भारतानं ३ मॅचची ही मालिका २-१नं जिंकली. एमएस धोनी हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या सामन्यात धोनीनं ११४ बॉलमध्ये नाबाद ८७ धावांची खेळी केली. धोनीच्या या खेळीमध्ये ६ चौकारांचा समावेश होता. पण मॅच संपल्यानंतर धोनीनं लगावलेला षटकार चर्चेत आलाय. मॅच संपल्यानंतर धोनीनं बॉल हातात घेतला आणि बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगरच्या हातात दिला. हा बॉल घे, नाही तर ते म्हणतील मी निवृत्त होतोय, असं धोनी बॉल देताना संजय बांगरला म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी इंग्लंड दौऱ्यातल्या लीड्समध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर धोनी बॉल घेऊन पॅव्हेलियनमध्ये गेला होता. तेव्हा धोनी निवृत्त होत आहे का? असा प्रश्न विचारला गेला होता.



धोनीच्या निवृत्तीबद्दल सुरु असलेल्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत रवी शास्त्रींनी इंग्लंड दौऱ्यात या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मॅचदरम्यान बॉलची अवस्था कशी झाली आहे, हे दाखवण्यासाठी धोनीनं अंपायरकडून बॉल घेतला होता. २०१९चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच होणार आहे, त्यामुळे बॉलची अवस्था कशी होते आणि त्यादृष्टीनं वर्ल्ड कपची रणनिती ठरवण्यासाठी धोनीनं बॉल घेऊन बॉलिंग प्रशिक्षक भरत अरूण यांना दिला, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी इंग्लंड दौऱ्यावेळी दिली होती.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान होतं. या सामन्यात धोनीनं सर्वाधिक रन केल्या आणि भारताचा ४ बॉल राखून विजय झाला. केदार जाधवनं नाबाद ६१ धावा करत धोनीला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकामध्ये भारताला जिंकण्यासाठी फक्त १ धाव हवी होती. तेव्हा केदार जाधवनं मार्कस स्टॉयनीसला चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलनंही महत्त्वाची भूमिका बजावली. चहलनं ४२ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ६ बळी टिपले. या कामगिरीबद्दल चहलला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला. तर तिन्ही मॅचमध्ये अर्धशतकं करणाऱ्या धोनीला मालिकाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. धोनीनं या मालिकेमध्ये १९३ च्या सरासरीनं १९३ धावा केल्या. यात ३ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांचा समावेश होता.


३७ वर्ष आणि १९५ दिवसाचं वय असताना मालिकाविराचा किताब पटकवणारा धोनी हा सगळ्यात बुजुर्ग खेळाडू आहे. याआधी हा विक्रम सुनिल गावसकर यांच्या नावावर होता. धोनीचा एकदिवसीय कारकिर्दीमधला हा सातवा मालिकाविराचा किताब आहे.