खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, `कमाल आहे हा माणूस`
Rahul Dravid On Reward By BCCI: राहुल द्रविडला जंटलमन ऑफ क्रिकेट का म्हणतात हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. द्रविडने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर जाहीर झालेल्या बक्षीसासंदर्भातील आपली भूमिका बासीसीआयला कळवली आहे.
Rahul Dravid On Reward By BCCI: क्रिकेटला जेंटलमन्स गेम म्हणत असाल तर राहुल द्रविड तो जेंटलमन आहे असं अनेकांनी अनेकदा म्हटल्याचं पाहायला मिळालं आहे. द्रविडने पुन्हा एकदा त्याला क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात सभ्य व्यक्ती का म्हटलं जातं हे दाखवून दिलं. द्रविडने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देऊन केलेल्या 5 कोटींपैकी अडीच कोटी रुपये घेण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. बीसीसीआयचे सचीव जय शाह यांनी हे बक्षीस जाहीर केल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघामधील सर्व खेळाडू, प्रशिक्षक वर्ग, सपोर्टींग स्टाफमध्ये हा पैसा वाटून देण्याचं निश्चित करण्यात आलं. यानुसार प्रमुख प्रशिक्षक म्हणून द्रविडला 5 कोटी रुपये मिळणार होता. तर इतर प्रशिक्षकांना 2.5 कोटी रुपये मिळणार होते. मात्र द्रविडने हे अतिरिक्त अडीच कोटी रुपये नकारले आहेत.
द्रविडने नेमकं काय सांगितलं?
द्रविडने बीसीसीआयला यासंदर्भात विनंती केली असून, आपल्यालाही अडीच कोटी रुपयेच द्यावेत असं म्हटलं आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींग कोचला जेवढं बक्षीस दिलं जात आहे तेवढेच म्हणजेच अडीच कोटी रुपयेच मला द्यावेत, असं द्रविडने बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. "राहुलला सपोर्टींग स्टाफला देण्यात आलेल्या पैशांइतकाच बोनस हवा आहे. आम्ही त्याच्या या भावनांचा आदर करतो," असं बीसीसीआयच्या सूत्रांनी द्रविडने केलेल्या मागणीसंदर्भात म्हटलं आहे. गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस महांब्रे, फिल्डींगचे प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याप्रमाणे आता द्रविडलाही अडीच कोटी रुपयेच दिले जाणार आहेत.
नक्की वाचा >> 'त्याला भारतात कोणीही विचारत नाही, त्याने आधी...'; शास्त्रींनी माजी कर्णधाराची लाजच काढली
यापूर्वीही द्रविडने असेच केले जेव्हा...
विशेष म्हणजे द्रविडने अशी समान वागणुकीची भूमिका घेण्याची पहिलीच वेळ नाही. भारतीय अंडर 19 संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2018 मध्येही त्याने अशीच भूमिका घेतलेली. त्यावेळी द्रविडला 50 लाख देणार होते तर त्याच्या इतर सहकाऱ्यांना 20 लाख बक्षीस जाहीर करण्यात आलं. तर खेळाडूंना 30 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं. द्रविडने त्यावेळीही अतिरिक्त पैसे घेण्यास नकार देत सर्वांना समान पैसे दिले जावेत अशी भूमिका घेत बीसीसीआयला तसं कळवलं. त्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक सपोर्टींग स्टाफला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये द्रविडलाही 25 लाख रुपयेच देण्यात आले.
नक्की वाचा >> 'राजकीय अजेंड्यामुळे जय शाहांना...'; गृहमंत्र्यांचा उल्लेख करत गावसकरांचं रोखठोक विधान
अनेकदा दाखवलाय असा निस्वार्थीपणा
द्रविडने असाच निस्वार्थीपणा पुन्हा एकदा दाखवला असून प्रत्यक्ष मैदानात उतरुन खेळत असतानाही द्रविडने अनेकदा संघाला आणि संघ भावनेला प्राधान्य दिल्याचं वेळेवेळी अधोरेखित झालं आहे. द्रविडचा हाच स्वभाव आता प्रशिक्षक पदावरुन पायउतार होतानाही कायम असल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.