मुंबई : महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 साली वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. 2011 साली वर्ल्डकप फायनल सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या प्लेईंग 11 पैकी आता 10 जणांनी निवृत्ती घेतली आहे. मात्र एक खेळाडू असा आहे, जो टीम इंडियासाठी अजूनही क्रिकेट खेळतोय. शिवाय हा खेळाडू 2027 चा वर्ल्डकप खेळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2011 च्या वर्ल्डकपची प्लेईंग 11 पाहिली तर त्यामध्ये वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, एमएस धोनी, युवराज सिंह, सुरेश रैना, हरभजन सिंह, जहीर खान, मुनाफ पटेल आणि एस श्रीसंत यांचा समावेश होता. यामधील 10 खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. तर आता केवळ विराट कोहली हा एकमात्र खेळाडू आहे जो, अजूनही इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय.


विराट कोहलीने 2008 साली त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. विराट कोहलीने आतापर्यंत भारताकडून 2011, 2015 आणि 2019 चा वनडे वर्ल्डकप खेळला आहे. विराट कोहलीचा फॉर्म आणि फिटनेस पाहता, तो केवळ 2023 नाही तर 2027 चा वर्ल्डकपही खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 


2027 चा वर्ल्डकपही खेळणार कोहली?


विराट कोहली आता 33 वर्षांचा आहे आणि 2027 च्या वर्ल्डकपच्या वेळी तो 38 वर्षांचा असणार आहे. सध्याचा त्याचा फिटनेस पाहिला तर विराट कोहली 2027 च्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकतो. यानुसार तो भारतासाठी पाच वर्ल्डकप खेळू शकतो.


सध्या टीम इंडियामधील तो एकमेव खेळाडू आहे, ज्याने शेवटचे तिन्ही वनडे वर्ल्डकप खेळले आहेत. शिवाय आगामी चौथा वर्ल्डकपंही तो खेळणार आहे. 2023 मध्ये हा वर्ल्डकप भारतात होणार आहे.